मुंबई : पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा योग ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमाच्या माध्यमातून जुळून आला आहे. आई-वडिलांकडून स्वरांचा अलौकिक वारसा लाभलेल्या कलापिनी यांनी स्वतंत्र प्रतिभेची गायिका म्हणून आपली ओळख निर्माण केली. जे अलौकिक स्वरसंचित आपल्याला लाभले आहे त्याचा अभ्यास, त्याच्याबद्दल आदर बाळगून आपले गाणे घडवणाऱ्या कलापिनी कोमकली यांच्याशी ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले संवाद साधणार आहेत. रविवारी, २७ नोव्हेंबरला ही संवाद मैफल रंगणार आहे. करोनाकाळातील मोठय़ा खंडानंतर ‘लोकसत्ता गप्पा’ पुन्हा सुरू होणार आहेत.
हिंदूस्तानी शास्त्रीय संगीतातील महामेरू पंडित कुमार गंधर्व आणि त्यांना तेवढय़ाच ताकदीने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी, प्रतिभावंत शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांची कन्या असलेल्या कलापिनी यांच्या कानावर लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताचे सूर पडत राहिले. त्यामुळे शास्त्रीय संगीत कळत-नकळत त्यांच्या मनात झिरपत होते, मात्र लहानपणी शास्त्रीय संगीतापेक्षा सुगम संगीताची ओढ आपल्याला जास्त होती, असे सांगणाऱ्या कलापिनी यांनी काहीसा उशिराच शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू केला. आई आणि वडिलांकडूनच त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. आज कुमार गंधर्वाची गायकी, त्यांचा सांगीतिक वारसा पुढे नेणाऱ्या शास्त्रीय गायिका म्हणून कलापिनी यांचा लौकिक आहे. देशभरातील सगळय़ा महत्त्वाच्या, मोठय़ा शास्त्रीय संगीत महोत्सवातून कलापिनी यांनी गायन केले आहे.
प्रतिभावंतांच्या नव्या पिढीची समर्थ प्रतिनिधी आणि प्रसिद्ध गायिका म्हणून कलापिनी यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाबरोबरच त्यांचे वडील पंडित कुमार गंधर्व यांचे गाणे आणि आई वसुंधरा यांच्याकडून घेतलेली तालीम अशा आठवणींचे स्वर ‘लोकसत्ता गप्पां’च्या निमित्ताने आळवले जाणार आहेत. विविध क्षेत्रांतील मातब्बरांशी निमंत्रितांचा खुला संवाद असे स्वरूप असलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमात यापूर्वी ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक सत्यशील देशपांडे, प्रतिभावंत कवी-गीतकार गुलजार, जावेद अख्तर, प्रतिभावान शास्त्रीय गायक पंडित मुकुल शिवपुत्र, उस्ताद रशीद खान, अभिनेते नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक-शाह हे प्रतिभावंत सहभागी झाले होते. गप्पांच्या या नव्या पर्वात कलापिनी कोमकली यांच्याशी प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले संवाद साधणार आहेत. गप्पांचा हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून त्याचा आस्वाद वाचकांना ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होणाऱ्या वार्ताकनातून घेता येईल.