वर्षभरात प्रभाव ओसरलेल्या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. प्रयोगशाळेत येणाऱ्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये स्वाइन फ्लू आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तीन दिवस ताप राहणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांची स्वाइन फ्लूसाठी चाचणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
गेल्या आठवडय़ात बदलापूर येथील महिलेचा शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. रुग्णालयात येण्यापूर्वीच तिची तब्येत बिघडली होती. स्थानिक डॉक्टरांनी केलेल्या तपासणीतच तिला स्वाइन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले असते तर तिचे प्राण वाचले असते. पावसामुळे वातावरण थंड झाल्याने स्वाइन फ्लूच्या एचवनएनवन विषाणूचा प्रभाव वाढला आहे. मुंबईत स्वाइन फ्लूचा फारसा प्रभाव अजूनही दिसत नसला तरी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी येत असलेल्या नमुन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे विषाणू सापडण्याचे प्रमाण जुलैमध्ये १५ टक्क्य़ांवर गेले आहे. जूनमध्ये हेच प्रमाण अवघा १.१ टक्का होते. गेल्या वर्षी जूनमध्ये हे प्रमाण चार टक्के तर जुलैमध्ये आठ टक्के होते.
‘स्वाइन फ्लूचा एचवनएनवन हा विषाणू परदेशातून आला तेव्हा त्याला रोखण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र आता चार वर्षांनंतर हा विषाणू वातावरणात स्थिरावला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्याला प्रतिबंध घालता येणार नाही. त्याचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात वातावरण थंड झाले की त्याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते,’ अशी माहिती ्नराज्य आरोग्य सेवेचे सहआयुक्त डॉ. व्ही. डी. खानंदे यांनी दिली. स्थानिक डॉक्टरांकडील औषधानेही ताप दोन दिवसात उतरला नाही तर स्वाइनफ्लूची शक्यता असू शकते. सहा-सात दिवसांनी तब्येत खालावल्यानंतर उपचार करणे कठीण जाते, असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा