शहरातील स्वाइन फ्लूची साथ ओसरल्याचा निर्वाळा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून अखेर देण्यात आला आहे. सोमवारी स्वाइन फ्लूचे अवघे दोन रुग्ण आढळले आहेत.
   दरम्यान, शहरातील स्वाइन फ्लूच्या मृत्यूंची संख्या ४९ वरून ४० वर खाली आणली गेली. उर्वरित ९ रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असला तरी त्यांच्या निधनाचे कारण वेगळे असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या मृत्यू निदान समितीने काढला, असे पालिकेच्या साथ नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
जानेवारीच्या मध्यापासून राज्याच्या अंतर्गत भागात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत रुग्ण आढळू लागले. आतापर्यंत मुंबईत १९१३ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी २२८ रुग्ण उपचारांसाठी मुंबईत आले होते. मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात उन्हाचा तडाखा वाढू लागल्यावर स्वाइन फ्लूचे विषाणू निष्प्रभ ठरू लागले. रुग्णांची सरासरी ४० वरून २० वर आली. गेल्या तीन दिवसात तर शनिवारी ७, रविवारी ४ व सोमवारी २ रुग्णांची नोंद झाली. शहराबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्याही शून्यावर आली.