स्वाइन फ्लूमुळे दोन दिवसात कोणीही मृत्यूमुखी पडलेले नसले तरी रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती ४२ वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसात आठजणांना स्वाइन फ्लूचे निदान झाले असून त्यातील सात महिला आहेत.
स्वाइन फ्लूने शहरात प्रवेश करून आठवडा झाला असून शहरातील रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. शहराबाहेरून उपचारांसाठी आलेल्या रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे. शहरात आतापर्यंत केवळ पश्चिम उपनगर व दक्षिण भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. मात्र आता घाटकोपरमधील १४ वर्षांच्या मुलीलाही स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे समोर आल्याने ही साथ वेगाने सर्वत्र पसरत असल्याचे दिसत आहे. चौघांना औषधे देऊन घरीच उपचार करण्यात येत असले तरी ठाण्यातील ३० वर्षांच्या महिलेला मात्र कृत्रिम श्वसनयंत्रणेची गरज भासली आहे.
बदलापुरात महिलेचा मृत्यू
बदलापुरातील एका साठ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून तिच्या वीस वर्षीय नातीला स्वाइन फ्लूची लागण झाली असून तिच्यावर उपचार चालू आहेत. या दोघीही बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज रोड परिसरात राहणाऱ्या आहेत. दरम्यान, घोडबंदर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती  रुग्णालय प्रशासनाने दिली.

Story img Loader