मुंबई : मुंबई, ठाण्यात ‘स्वाईन फ्लू’चा वेगाने फैलाव होत आह़े  मुंबईत आठवडय़ाभरात ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या पाचपट, तर ठाण्यात तीन दिवसांत दुप्पट रुग्णनोंद झाली़  अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील ‘स्वाईन फ्लू’च्या बळींची संख्या तीन झाली आह़े

मुंबई, ठाण्यात डेंग्यू, मलेरियाबरोबरच ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढले आह़े  मुंबईत जूनमध्ये ‘स्वाईन फ्लू’चे दोन रुग्ण होत़े  त्यानंतर जुलैमध्ये रुग्णवाढ होऊ लागली़  शहरात जुलैच्या पंधरवडय़ात ११ रुग्ण आढळले होत़े  मात्र, १७ ते २४ जुलै या कालावधीत रुग्णसंख्या ११ वरून ६२ वर पोहोचली़  म्हणजेच जानेवारी आणि जूनमध्ये आढळलेल्या प्रत्येकी दोन रुग्णांसह २४ जुलैपर्यंत शहरात ‘स्वाईन फ्लू’चे एकूण ६६ रुग्ण आढळल़े     

मुंबईत २०२० मध्ये ‘स्वाईन फ्लू’चे ४४, तर २०२१ मध्ये ६४ रुग्ण आढळले होते. यंदा जुलैमध्येच रुग्णसंख्या ६६ वर गेल्याने आणखी रुग्णवाढीची भीती व्यक्त होत आह़े  ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांपाठोपाठ आता मीरा-भाईंदर, नवी मुंबई, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांत ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ६६ रुग्णांपैकी ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली शहरांमधील रुग्णसंख्येत तीन दिवसांत दुपटीने वाढ झाली आह़े  अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जुलैमध्ये ठाणे जिल्ह्यात १ लाख १८ हजार ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ६६ रुग्णांना ‘स्वाईन फ्लू’ची लागण झाल्याचे समोर आल़े  ठाणे महापालिका क्षेत्रात २५ जुलै रोजी ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या २० होती़  ती आता ४० वर पोहोचली आह़े  त्यातील १८ जणांवर उपचार सुरू आहेत़

ही काळजी घ्या

खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ करावे, डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, लक्षणे आढळल्यास स्वत:हून औषधे न घेता वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत.

पालिकेकडून उपाययोजना

यंदा ‘स्वाईन फ्लू’चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आह़े  यादृष्टीने पालिकेने आवश्यक उपाययोजना केल्या असून, या रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यात आली आह़े  तसेच आवश्यक औषधांचा साठाही रुग्णालयात उपलब्ध आहे. येत्या काळात प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेने उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

लक्षणे काय?

ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलटय़ा, जुलाब ही सर्वसाधारण ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आहेत. गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र होऊन आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो. रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलटीतून रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.