डिसेंबरच्या मध्यापर्यंत फारसा सक्रिय नसलेला स्वाइन फ्लू नववर्षांत पुन्हा परतला आहे. जानेवारीपासून राज्यात एकूण २७ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. यातील सर्वाधिक म्हणजे १५ मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत विशेषत पश्चिम उपनगरांत स्वाइन फ्लूचे दहा रुग्ण आढळले आहेत. यातील दोन रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आहेत. स्वाइन फ्लूवर उपचार शक्य आहेत, त्यामुळे लक्षणे आढळल्यास तातडीने पालिका रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
आतापर्यंत राज्यात स्वाइन फ्लूचे एकूण ११३ रुग्ण सापडले. यंदा स्वाइन फ्लूचा जोर नागपूरमध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ५० रुग्ण नागपूरमध्ये तर त्याखालोखाल ४४ रुग्ण पुण्यात आढळले आहेत. अवघ्या तीन दिवसांत दहा रुग्ण आढळल्याने मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, गुजरातमध्येही स्वाइन फ्लूने ६२ जणांचा बळी घेतला आहे.
स्वाइन फ्लूची लक्षणे
सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, वांती, जुलाब अशी लक्षणे. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.
*मनाने औषधे घेऊ नयेत.
*संसर्ग असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
*तोंडावर मास्क लावावा.
*हेल्पलाइन ०२२-२४११४०००
मुंबईतील बळी
*स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत झालेल्या चारपैकी दोन मृत्यू गुरुवारी. मृत्यूंची नोंद कस्तुरबा आणि जसलोक रुग्णालयांत.
*जळगाव येथून आलेल्या ५६ वर्षांच्या पुरुषाचा दहा दिवसांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू
*पालघरवरून आलेल्या ६१ वर्षांच्या महिलेचा अंधेरी येथील होलीस्पिरीट रुग्णालयात ३ फेब्रुवारी रोजी मृत्यू
पालिकेच्या सर्व रुग्णालयात टॅमीफ्लू औषधे, मास्क यांच्यासह दोन कृत्रिम श्वसनयंत्रणा केवळ स्वाइन फ्लूसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पालिकेची तीन प्रमुख रुग्णालये, सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर व परिचारिकांना स्वाइन फ्लूचा रुग्ण हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त (मुंबई महापालिका)
स्वाइन फ्लू वाढण्याची कारणे सांगता येणार नाहीत. कोणत्याही एन्फ्लूएन्झाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पावसाळी वातावरणात वाढतो, पण थंड हवामान या विषाणूच्या संसर्गाला पोषक ठरु शकते. स्वाइन फ्लूचा विषाणू बदललेला नाही किंवा त्याचा प्रभाव वाढलेला नाही.
– मंजुश्री चढ्ढा, उपसंचालक, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था