स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत कमी झाली असली तरी मृत्यूच्या प्रमाणात मात्र त्या मानाने घट झालेली नाही. गेल्या पंधरा दिवसांत राज्यभरात स्वाइन फ्लूच्या नवीन रुग्णांची सरासरी १२० वरून २२ वर आली असली तरी या काळात ६७ मृत्यू झाले आहेत.
 हिवाळा लांबल्याने स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात येत नव्हती. त्यात मार्चच्या पहिल्या आठवडय़ात गारपीट तसेच थंडीची लाट आल्याने दररोज सरासरी १२० नवीन रुग्णांची नोंद सुरू होती. मात्र तिसऱ्या आठवडय़ानंतर तापमापकातील पारा उतरू लागला आणि रुग्णांची संख्या निम्म्यावर येण्यास सुरुवात झाली. एप्रिलपासून तर ही सरासरी ३० ते ३५ वर आली आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूंची संख्या मात्र त्या प्रमाणात घटलेली नाही. गेल्या पंधरा दिवसांत स्वाइन फ्लूच्या  ५०८ नवीन रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या साथरोग नियंत्रण कक्षाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
स्वाइन फ्लूचे काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते, काहींची स्थिती चिंताजनक होती. त्यामुळे मृत्यू तातडीने थांबलेले नाहीत. मात्र उन्हाळा वाढत असल्याने पुढील काही दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत तसेच मृत्यूंमध्येही घट होईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत ४४२ मृत्यू
गुरुवारी, ९ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या ४८४८ वर पोहोचली होती तर ४४२ जण मृत्युमुखी पडले होते. यात मुंबईतील १६६४ रुग्णांचा व १९ मृत्यूंचा समावेश आहे.  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १५२ वर आली आहे.