एचवनएनवन विषाणूच्या संसर्गामुळे शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात एका महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. बदलापूर येथे राहणारी ही महिला आठवडय़ाभरापूर्वी उपचारांसाठी या रुग्णालयात दाखल झाली होती.
ताप, कफ, श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने ३२ वर्षीय महिलेला १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची तब्येत बिघडत गेल्याने अतिदक्षता विभागात या महिलेवर उपचार सुरू होते.
स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने तिची चाचणी करण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात तब्येत ढासळल्याने बुधवारी महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या संसर्गजन्य आजार विभाग प्रमुख मंगला गोमारे यांनी दिली. या महिलेच्या मृत्यूनंतर स्वाइन फ्लूचा अहवाल प्राप्त
झाला.
मुंबईत जूनपासून स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहेत. १ जानेवारीपासून ३० जुलैपर्यंत राज्यात स्वाइन फ्लूचे ४२५ रुग्ण आढळले असून ९५ जणांना मृत्यू झाला. त्यापैकी ३० जण पुण्यातील आहेत. २००९ मध्ये स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला होता. त्यानंतरच्या वर्षांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होत गेली. मात्र जुलै महिन्यात पुण्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या
वाढली.
मुंबईत आतापर्यंत स्वाइन फ्लूचे केवळ तीन रुग्ण आढळले असले आणि नुकताच झालेला मृत्यू मुंबई शहरातील नागरिकाचा नसला तरीही आरोग्य विभागाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.