मुंबई : पावसाळ्यात डेंग्यू, हिवतापाबरोबरच स्वाईन फ्लूच्या रुग्ण वाढू लागले असून मुंबईत खासगी रुग्णालयांत दररोज साधारणपणे २० ते २५ रुग्ण स्वाईन फ्लूचे आढळून येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुंबईकरांभोवती स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजारांबाबत १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईत स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण सापडले होते. ही संख्या तुलनेने कमी वाटत असली तरी मुंबईतील अनेक खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातील जवळपास १० ते १२ रुग्णांमध्ये सर्वसामान्य तापाबरोबरच स्वाईन फ्लूची लक्षणेही दिसून येत आहेत. या रुग्णांची रक्त तपासणी केल्याशिवाय नेमके निदान करणे अशक्य असते. त्यामुळे त्यांना तपासणी करण्यास सांगून ज्वरावरील उपचार सुरू केले जातात, असे चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सल्लागार असलेले डॉ. राजांशू तिवारी यांनी सांगितले. तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, या रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र तपासण्यांनंतर फार कमी रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू आढळून आल्याची जे.जे. रुग्णालयातील एका डाॅक्टरने दिली.
हेही वाचा : Mumbai : मुंबई लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाने एक पाय आणि हात गमावला, मध्य रेल्वेने केलं ‘हे’ आवाहन
विषाणूमध्ये बदल?
मुंबईत तापाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र त्यातील २० ते २५ रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू सदृश लक्षणे दिसून येत आहेत. या रुग्णांना स्वाईन फ्लूची तपासणी करण्यास सांगण्यात येत आहे. दरवर्षी आजारांच्या विषाणूंच्या गुणसूत्रांमध्ये काही प्रमाणात बदल होऊन त्यांचे उत्परिवर्तन होते. यातील नवीन विषाणू हे सौम्य किंवा घातक असण्याची शक्यता असते. सौम्य विषाणू असल्यास त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. परंतु घातक असल्यास रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते. यावेळी रुग्णांमधील लक्षणांमध्ये वाढ झाली असल्याने स्वाईन फ्लूच्या विषाणूमध्ये काही बदल झाले असण्याची शक्यता असल्याची माहिती डॉक्टरने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे.
हेही वाचा : पुनर्वसनातील घरावर संपूर्ण फंजीबल चटईक्षेत्रफळ देणे बंधनकारक नाही, म्हाडाकडून विकासकांना दिलासा
स्वाइन फ्लूचे लक्षण
ताप, थंडी लागणे, खोकला, घशामध्ये खवखव, सर्दी, डोळे लाले होणे, अंगदुखी, डोकेदुखी
© The Indian Express (P) Ltd