शहरातील थंडी पुन्हा एकदा वाढली असून, स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी अधिक पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखीही वाढली आहे. स्वाइन फ्लूमुळे शनिवारी दाखल झालेल्या पाचपैकी चौघांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या कुटुंबीयांनाही औषधोपचार देऊन साथ आटोक्यात ठेवण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. 

राज्यात नागपूर पुणे या दोन शहरांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामानाने दमट व उष्ण हवेच्या मुंबईत या आजाराची साथ पसरली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांत थंडी पुन्हा परतली असून, त्यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. स्वाइन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपायही हाती घेण्यात आले असले, तरी २००९ या वर्षांतील व त्यानंतर २०१२ मधील अनुभव लक्षात घेता स्वाइन फ्लूने पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसाठी नवीन आव्हान उभे केले आहे. राज्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली असून, आतापर्यंत ३८ मृत्यू झाले आहेत. त्यातच मुंबईच्या रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्याही ३४ झाली आहे. आतापर्यंत शहरातील कोणताही नागरिक स्वाइन फ्लूमुळे दगावला नसला, तरी चार जण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील रुग्ण – १८६
मृत्यू – ३८
मुंबईतील रुग्ण – ३४
मृत्यू – ५

Story img Loader