मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणारे जन्म दाखला आणि मृत्यू प्रमाणपत्र गेल्या दोन आठवड्यांपासून नागरिकांना मिळू शकलेले नाही. संबंधित प्रणाली अद्यायावत होत असल्यामुळे तूर्तास जन्म दाखला आणि मृत्यू प्रमाणपत्र देणे अवघड असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परिणामी, पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रांत खेटे घालूनही पदरी निराशा येत आहे.
काही वर्षांपूर्वी जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस पालिकेच्या विभाग कार्यालयांत खेटे घालावे लागत होते. तसेच प्रमाणपत्रामधील चूक सुधारण्यासाठी नागरिकांना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागत होत्या. पालिकेने काही वर्षांपूर्वी जन्म दाखला आणि मृत्य प्रमाणपत्र संगणकीय पद्धतीने उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आणि अनेक समस्यांमधून नागरिकांची सुटका झाली. गेल्या दोन आठवड्यांत अनेकांनी जन्म दाखला आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विविध नागरी सुविधा केंद्रांत अर्ज केले आहेत. मात्र अद्यापही त्यांना ते मिळालेले नाही. नव्या संगणकीय प्रणालीमुळे प्रमाणपत्र मिळविणे अधिक सोपे झाले आहे. मात्र, दोन आठवड्यांपासून कोणत्याच नागरी सुविधा केंद्रांत ही दोन्ही प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. त्यासाठी नागरी सुविधा केंद्रांना लॉगीन देण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्र देण्याची प्रणाली अद्यायावत होत आहे.
गेल्या दोन आठवड्यांत अनेकांनी जन्म दाखला आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा केंद्रांत अर्ज केले आहेत. मात्र अद्यापही त्यांना ते मिळालेले नाही.
मृत्यू प्रमाणपत्र प्रक्रिया
एखाद्या व्यक्तीचा घरी वा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर खासगी डॉक्टर वा रुग्णालयाकडून मृत्यू प्रमाणपत्र घेण्यात येते. त्यावर मृत व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, मृत्यूचे कारण, वेळ आदी माहिती नमूद करण्यात येते. पार्थिवावर ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात तेथे हे प्रमाणपत्र सादर करावे लागते. या प्रमाणपत्राच्या पडताळणीअंती अंत्यसंस्कार केली जाते. शिवाय एक अर्ज व पावतीही मृताच्या नातेवाईकांना देण्यात येते. ही कागदपत्रे मृताचे वास्तव्य असलेल्या परिसरातील पालिकेच्या विभाग कार्यालयात सादर करावी लागतात. तिथे नोंद झाल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र तयार होते. ते नंतर महापालिकेच्या कोणत्याही विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात अर्ज करून मिळविता येते.
हेही वाचा…मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी
जन्म दाखला प्रक्रिया
बाळाचा जन्म झाल्यानंतर संबंधित प्रसूतीगृह अथवा रुग्णालयात त्याची नोंद करण्यात येते. संबंधित प्रसूतीगृह अथवा रुग्णालयातर्फे बाळाच्या जन्माची माहिती त्याच परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाला दिली जाते. आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेअंती संबंधित विभाग कार्यालयात बाळाच्या जन्माची नोंद होते. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईमधील महानगरपालिकेच्या २४ पैकी कोणत्याही विभाग कार्यालयातील नागरी केंद्रातून बाळाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत शुल्क भरून घेता येते.