मुंबई : मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचे आरोप सिस्ट्रा कंपनीने फेटाळून लावले आहेत. मात्र, त्याचवेळी एमएमआरडीएबरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमएमआरडीएशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद सुरु असल्याचेही सिस्ट्राने स्पष्ट केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आर्थिक लाभासह अनेक गंभीर आरोप फ्रान्स येथील सिस्ट्रा कंपनीने केले होते. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचे एमएमआरडीएने नमूद केले होते. त्यावर भूमिका स्पष्ट करणारे पत्र सिस्ट्राने गुरूवारी प्रसिद्ध केले आहे.

एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पासाठी मागील कित्येक वर्षांपासून फ्रांसमधील सिस्ट्रा कंपनी सल्लागार म्हणून काम पाहत आहे. मात्र नुकतेच सिस्ट्राने एमएमआरडीएवर अनेक गंभीर आरोप करत एका मोठ्या वादाला तोंड फोडले आहे. सिस्ट्राने एमएमआरडीएवर आर्थिक लाभाच्या मागणीचा गंभीर आरोप केले आहेत. तर एमएमआरडीएने सिस्ट्राचे हे आरोप फेटाळून लावत सिस्ट्राविरोधात करार रद्दतेची कारवाई सुरु केल्याने त्यांच्याकडून असे आरोप केले जात असल्याचे म्हटले आहे. मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण), मेट्रो ७अ (गुंदवली ते विमानतळ) आणि मेट्रो ९ (दहिसर ते मिरा-भाईंदर) या मार्गिकेतील विविध कामांसाठी सिस्ट्रा २०२० पासून सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. या कामांसाठीचा करार २०२४ मध्ये संपला होता, त्यास आॅक्टोबर २०२४ मध्ये एमएमआरडीएकडून डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मात्र जानेवारी २०२४ मध्ये एमएमआरडीएने कंपनीला देयके निलंबति करण्यासंबंधीची नोटीस बजावली होती. त्यानंतर सिस्ट्रा आणि एमएमआरडीएत वाद सुरु झाला होता. आॅक्टोबर २०२४ मध्ये सिस्ट्राने फ्रेंच दुतावासाशी संपर्क साधत एमएमआरडीएविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत दुतावासाने राज्य सरकारला हस्तक्षेप करण्याची तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने एमएमआरडीएकडून अहवाल मागवला होती. एमएमआरडीएने २८ पानी अहवाल सादर केला होता. सिस्ट्राकडून कराराचा भंग करण्यात आल्याचे एमएमआरडीएने या अहवालात स्पष्ट केले होते. हा अहवाल सादर केल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये एमएमआरडीएने मेट्रो ५,७ अ आणि ९ साठीचा कारर रद्द करण्यासंबंधी सिस्ट्राला नोटीस बजावली आणि त्यानंतर सिस्ट्राने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्यायालयात सुनावणीच्या एक दिवस आधी सिस्ट्राने एमएमआरडीएवर आर्थिक लाभाच्या मागणीचे गंभीर आरोप केले होते.

न्यायालयाने करार निलंबनाची नोटीस रद्द केली असली तरी कंपनीविरोधात कारवाई करण्याचे एमएमआरडीएचे अधिकार आबाधित ठेवले आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने याचअनुषंगाने सिस्ट्राविरोधात कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आता मात्र सिस्ट्राने नरमाईची भूमिका घेतली आहे. गुरुवारी सिस्ट्राकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. कंपनी २००७ पासून मेट्रोसाठी काम करत आहे. मेट्रो १ च्या डिझाईनच्या कामातही कंपनीची भूमिका महत्त्वाची असून मागील कित्येक वर्षांपासून कंपनी मेट्रोसाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. यापुढेही मेट्रोसाठी काम सुरु ठेवण्यास कंपनी उत्सुक आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या अधिकार्यांशी संवाद सुरु असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सिस्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरी कुमार सोमलराज यांच्या नावे हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Story img Loader