प्राध्यापकांच्या संपाचा फटका परीक्षांना बसू नये म्हणून प्राचार्य व कुलगुरूंना राज्य सरकारकरवी सुचविण्यात आलेल्या उपाययोजना व दिले गेलेले अधिकार यामुळे मुंबई विद्यापीठात २८ मार्चपासून सुरू  होणाऱ्या ‘तृतीय वर्ष वाणिज्य’ (टीवायबीकॉम) शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची गरज भासणार नाही.
पुढील आठवडय़ापासून सुरू होणारी टीवायबीकॉमची परीक्षा २७० केंद्रांवर होणार आहे. तब्बल ७५ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून विद्यापीठाची ही सर्वात मोठी परीक्षा मानली जाते. प्राध्यापकांच्या असहकारामुळे ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे, टीवायबीकॉमची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, ही मागणी ‘अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य संघटने’ने सारख्या प्राध्यापकांच्या संघटनेकडूनही करण्यात येत आहे. परंतु, सरकारने बुधवारी रात्री काढलेल्या आदेशामुळे हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारी आदेशामुळे आता टीवायबीकॉमची परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नाही, असे मुंबई विद्यापीठाचे अधिष्ठाता (वाणिज्य शाखा) मधू नायर यांनी अधिसभा बैठकीतील चर्चेदरम्यान स्पष्ट केले.
 युवा सेनेचे सदस्य दिलीप करंडे, प्रदीप सावंत यांनी टीवायबीकॉम परीक्षेच्या अनिश्चिततेचा प्रश्न उपस्थित करून कुलगुरूंनी टीवायबीकॉमची परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही, असे जाहीर करत विद्यार्थ्यांना आश्वस्त करावे, असा आग्रह धरला.

Story img Loader