संपकरी प्राध्यापकांच्या गैरहजेरीमुळे ‘तृतीय वर्ष वाणिज्य शाखा’ (टीवायबीकॉम) परीक्षेच्या पहिल्या दिवशी उडालेली गोंधळाची परिस्थिती आटोक्यात आणण्यात आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे.
कंत्राटी व तात्पुरत्या सेवेत असलेल्या प्राध्यापकांच्या व शिक्षकेतर तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने महाविद्यालये परीक्षा घेत आहेत. त्यातच काही महाविद्यालयातील संपकरी प्राध्यापकांनी परीक्षेच्या कामात सहभागी होण्यास तयारी दर्शविल्याने या महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरळीतपणे पार पाडली. सोमवारी चेंबूरमधील ‘स्वामी विवेकानंद महाविद्यालया’तील पाच-सहा शिक्षकांनी परीक्षेच्या कामात सहभाग घेतला. पण, हे शिक्षक फारच थोडे आहेत. बहुतांश शिक्षकांचा परीक्षेच्या कामावरील बहिष्कार अद्याप कायम असल्याने महाविद्यालयांना परीक्षेकरिता तात्पुरत्या सेवेत असलेल्या शिक्षकांची मदत घ्यावी लागते आहे.
टीवायबीकॉमच्या अकाउंटिंग व ऑडिटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, वाणिज्य व बँकिंग आणि फायनान्स पेपर-३ या विषयाच्या लेखी परीक्षा सर्व केंद्रांवर सोमवारी सुरळीत पार पडल्या, असे परीक्षा विभागाचे नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले. सोमवारी कुठल्याही परीक्षा केंद्रांवर परीक्षा उशीरा सुरू झाल्या नाहीत. ज्या विषयाची विद्यार्थीसंख्या कमी आहे, अशा विषयाचे पेपर आजही वेबलिंकच्या माध्यमातून पाठविण्यात आले. तरीही पेपर सकाळी११ वाजता सुरू करण्यात कोणतीच अडचण आली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान ‘तृतीय वर्ष विज्ञान शाखे’च्या (टीवायबीएससी) रसायनशास्त्र विषयाची परीक्षा उद्यापासून (मंगळवार) सुरू होत आहे.
अत्यावश्यक सेवा ठरवावी
संपकरी प्राध्यापकांच्या मागण्या रास्त असल्या तरी दोन महिने परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे स्पष्ट करत ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने (मनविसे) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि पेपर तपासणी (निकाल प्रक्रिया) यासाठी जितका कालावधी लागतो तो अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी केली आहे. मनविसेने या संदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा