मुलाच्या आठवणीने सतत पाणावलेले डोळे, जीवनाकडे बघण्याबाबतची वाढती उदासीनता, आणि दररोजच्या जगण्याची चिंता असे वातावरण आहे जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलन करणाऱ्या तबरेज सायेकर या तरुणाच्या घरात.. स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध करत आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तबरेजचा मृत्यू झाला. या घटनेला आज दीड वर्ष झाले. पण त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तर लांबच, शासनाचा प्रतिनिधीसुध्दा कधी भेटायला आला नाही. सरकारी अनास्थेच्या या अजब नमुन्यामुळे तबरेजचे व्यथित कुटुंब हवालदील झाले आहे. आपला पिढीजात मासेमारीचा व्यवसाय वाचवण्यासाठी अनेक लोक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनात उतरले होते. एप्रिल २०११ मध्ये माडबनमध्ये झालेल्या आंदोलनाचे पडसाद जवळच्याच साखरीनाटे गावात उमटले. त्याठिकाणीही लोकांनी आंदोलन सुरू केले त्यामुळे जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तबरेज सायेकरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवरून राजकारण तापले होते. पण या तापलेल्या राजकारणामध्ये तबरेजचे कुटुंब मात्र करपून गेले आहे. वृध्द आईवडिलांचा उतारवयातील अधारच संपला आहे, त्यातच वडिलांच्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे रोजच्या जगण्याचा प्रश्न सोडवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तबरेजच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत तर नाहीच, पण सहानुभूतीचे शब्दही नाहीत.. तबरेजच्या कुटुंबीयांशी बोलताना ही व्यथा स्पष्ट उमटलेली जाणवत होती. उत्तर म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रूच येत होते, आणि तबरेजची आई एवढेच म्हणत होती “माझा आधार गेला” पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची एवढी मोठी किमत मोजावी लागत असेल तर आम्ही स्वातंत्र्यात वावरत आहोत का, असा सवाल मच्छीमार नेते अमजद बोरकर यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा