मुंबई : तडीपार आरोपी गोरेगाव येथे गुरुवारी एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याची माहिती मिळताच तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र आरोपीने पोलीस पथकावरही हल्ला केला. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून २३ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी चार गुन्हे दाखल असून त्याच्याविरोधात दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> महामार्गावरील अपघातातील जखमींसाठी १७ नवीन ‘ट्रॉमा केअर सेंटर’! समृद्धी महामार्गावर ७१ रुग्णवाहिका करणार तैनात…
बांगूर नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संदीप झगडे गुरूवारी रात्री कर्तव्यावर होते. गोरेगावमधील भगतसिंह नगर येथे दोन व्यक्तींमध्ये हाणामारी सुरू असल्याचा संदेश नियंत्रण कक्षाकडून बांगूर नगर पोलीस ठाण्याला प्राप्त झाला. त्यानुसार झगडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संशयीत आरोपी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करीत होता. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. यावेळी आरोपीने पोलिसांना मारहाण केली, तसेच पोलीस पथकावर फरशीचा तुकडा फेकला. पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सराईत चोर आहे. त्याच्याविरोधात चार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच एकदा त्याच्याकडून बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात एका वर्षासाठी त्याला तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही त्याने मुंबईत येऊन गुन्हा केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.