अहमदाबाद येथून तडीपार करण्यात आल्यानंतर मुंबईत येऊन चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपीला बोरीवली पोलिसांनी अटक केली. अजीत पिल्ले असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह अहमदाबादच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेमुळे मुंबईतील अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : दोन हजार रुपये घेऊन बोगस आधारकार्ड देणाऱ्यास अटक
गेल्या काही दिवसांत उत्तर मुंबईत रात्री घरफोडीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच बोरीवली पोली ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील व अन्य पोलीस पथकाने गस्त घालताना अजीत पिल्लेला ताब्यात घेतले. चौकशीत तो जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा पूर्व इतिहास असलेला गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.
रात्री उशिरा रिक्षातून फिरुन तो घरफोडी करीत होता –
अजीत हा गुजरातच्या अहमदाबादचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध तेथे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली होती. तडीपार केल्यानंतर तो अहमदाबाद येथून बसने मुंबईत येत होता. रात्री उशिरा रिक्षातून फिरुन तो घरफोडी करीत होता. त्यानंतर तो पुन्हा बसने अहमदाबाद येथे जात होता. रिक्षाचे भाडे परवडत नसल्याने त्याने मालाड येथून काही दिवसांपूर्वी एक दुचाकी चोरली होती. या दुचाकीचा तो गुन्हे करण्यासाठी वापर करीत होता. घरफोडीनंतर तो दुचाकी बोरिवली येथे उभी करून तो अहमदाबादला जात होता. त्याच्या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली..