म्हाडाच्या टागोरनगर वसाहतीच्या पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचे जाहीर झाल्यानंतर या निविदेमध्ये विशिष्ट बिल्डरलाच हे काम कसे मिळेल याची काळजी या निविदांच्या अटी व शर्ती तयार करताना घेतल्याचे कळते. या बिल्डरलाच आतापर्यंत म्हाडाच्या इमारती बांधण्याची कामे देण्यात आली होती. या बांधकामांचा दर्जा चांगला नसतानाही म्हाडाने पुन्हा याच बिल्डरला झुकते माप देण्यामागे ‘अर्थ’कारण असल्याची चर्चा आहे.
टागोरनगर या म्हाडाच्या वसाहतीला अद्याप मालकी हक्क मिळालेला नाही. त्यामुळे या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा स्वत:च करणार असल्याचे मुंबई मंडळाचे तत्कालीन सभापती अमरजितसिंग मनहास यांनी जाहीर केले होते. जागतिक पातळीवर निविदा मागविण्याचेही त्यावेळी जाहीर करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात म्हाडाने ज्या पद्धतीने अटी व शर्ती तयार केल्या आहेत ते पाहता विशिष्ट बिल्डरचीच सोय व्हावी, याची काळजी घेण्यात आली आहे. या बिल्डरकडून म्हाडाच्या अधिकाऱ्याला प्रत्येक महिन्याचा त्यांचा जितका पगार असेल तितके पैसे दिले जातात, अशीही चर्चा आहे.
याच बिल्डरला मध्यंतरी एका झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे कामही निविदा न मागविता देण्यात आले होते. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी सतीश गवई यांनी म्हाडा भूखंडावरील झोपु योजनांसाठी निविदा काढल्या जातील, असे जाहीर केले होते. परंतु आपल्याच विधानाला बगल देत सदर झोपु योजनेचे काम निविदा न मागविताच देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आताही टागोरनगर वसाहत याच बिल्डरला मिळावी, असे म्हाडा अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मध्यंतरी या वसाहतीसाठी दोन बडय़ा बिल्डरांनी प्रयत्न चालविले होते. त्यासाठी सोसायटय़ांची खोटी कागदपत्रेही सादर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर म्हाडाने या दोन्ही बडय़ा बिल्डरांचे प्रस्ताव फेटाळून निविदा मागवून टागोरनगरचा पुनर्विकास स्वत: करण्याचे ठरविले आहे.

Story img Loader