मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसैन राणा याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग सुकर झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. मुंबई दहशवादी हल्ल्यांच्या पंधरा दिवसांपूर्वी राणा स्वत: मुंबईत होता. मुंबई पोलिसांच्या हाती मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीचे ई-मेल व हेडलीसोबत राणाने केलेला प्रवास याचे पुरावे लागले होते. त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच राणाला त्याची पूर्ण कल्पना असल्याचे स्पष्ट झाले होते.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी तहव्वूर हुसैन राणाच्या प्रत्यार्पणाला यापूर्वीच अमेरिकेतील न्यायालयाने मंजुरी दिली होती. पण त्याविरोधात राणाने अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. पण तेही फेटाळण्यात आले. राणा सध्या लॉस एंजेलिस येथे तुरुंगात आहे.
दोन वर्षांत आठ वेळा मुंबईत
मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी हेडली २००६ ते २००८ या दोन वर्षांमध्ये आठ वेळा मंबईत आला होता. त्या वेळीच त्याने हल्ला झालेल्या ठिकाणांची पाहणी केल्याचा आरोप आहे. पण हल्ल्यापूर्वी हेडलीऐवजी राणा मुंबईत आला होता.
आरोपपत्र दाखल झालेला पाचवा आरोपी
तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे यासाठी मुंबई पोलिसांसह सर्वच यंत्रणा प्रयत्न करीत होत्या. राणाविरोधात भक्कम पुरावा उभा करता यावा म्हणून २०२३ मध्ये गुन्हे शाखेने तहव्वूर राणाविरोधात ४०५ पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेला राणा हा पाचवा आरोपी आहे. यापूर्वी चार आरोपींविरोधात गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी मुंबईत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल आहे.
परदेशात दोघेही एकत्र असल्याचे पुरावे
● गुन्हे शाखेला हेडलीचे दोन ई-मेल प्राप्त झाले होते. त्यात ते कथित राजकीय नेत्याचे काय करायचे याबाबत चर्चा करीत आहेत. त्यातील एका ई-मेलमध्ये हेडलीने पाकिस्तानातील मेजर इक्बालचा उल्लेख केला होता. याशिवाय हेडली व राणा परदेशात एकत्र फिरल्याचे पुरावेही गुन्हे शाखेला प्राप्त झाले आहेत.
● तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली बालपणीचे मित्र आहेत. राणा पाकिस्तानात स्थायिक असताना तेथील लष्करामधील वैद्याकीय विभागात कार्यरत होता. त्याने १९९० मध्ये पाकिस्तानी लष्करातील नोकरी सोडली. त्यानंतर राणाने कॅनडाचे नागरिकत्त्व स्वीकारले. तेथून तो नंतर अमेरिकेत स्थायिक झाला.
● हेडलीने भारतात रेकी केली त्या वेळी त्याने थेट पाकिस्तानात दूरध्वनी करणे टाळले. त्याऐवजी राणाला संपर्क साधून सर्व माहिती द्यायचा. ही माहिती पुढे राणाकडून हँडलर्सला पुरवली जायची.