मुंबई : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेली ठिकाणे निश्चित करण्यात तहव्वूर राणा याची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. डेव्हिड हेडली मुंबईत येण्याआधी राणाने मुंबईत येऊन या ठिकाणांची माहिती घेतली आणि ती हेडलीला पुरवली, असा त्याच्यावर आरोप आहे.
मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस आणि लिओपोल्ड कॅफे या ठिकाणांना लक्ष्य केले होते. मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेविड हेडली २००६ ते २००८ या दोन वर्षांमध्ये आठ वेळा मंबईत आला होता. त्यावेळी त्याने हल्ला झालेल्या ठिकाणांची पाहणी केल्याचा आरोप आहे.

पण हल्ल्यापूर्वी हेडलीऐवजी राणा मुंबईत आला होता. राणा अमेरिकेहून प्रथम दुबईला गेला. तो १२ नोव्हेंबर, २००८ रोजी विमानाने मुंबईत आला. पवईतील एका आलीशान हॉटेलमध्ये तो वास्तव्याला होता. पवईतील हॉटेलमध्ये २० आणि २१ नोव्हेंबर रोजी वास्तव्याला असताना त्याने साक्षीदारासोबत दक्षिण मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांबाबत चर्चा केली होती. दहशवाद्यांनी याच ठिकाणांना लक्ष्य केले.

हेडलीच्या दौऱ्यातही मदत

मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी ठिकाणे निश्चित करण्याची जबाबदारी डेव्हिड हेडलीवर सोपवण्यात आली होती. त्याच्यावर कोणालाही संशय येऊ नये, यासाठी हेडलीचा दौरा मुंबईत व्यावसायिक असल्याचे दाखवण्यात आले होते. हे करण्यात राणाचा मोठा सहभाग होता. राणाचा इमिग्रेशन व्यवसाय होता. त्याचाच आधार घेऊन त्याच्या कंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभे करण्यात आले. त्याच्याच कामासाठी हेडली मुंबईत यायचा. यावेळी त्याने अनेक संवेदनशील ठिकाणांची टेहळणी केल्याचा आरोप आहे. हेडलीने याच इमिग्रेशन सेंटरचा कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्ड छापले होते. हेडली २००६ ते २००८ या दोन वर्षांमध्ये आठ वेळा मंबईत आला होता.

तिहार तुरुंगात ठेवणार?

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणल्यानंतर तिहार तुरुंगात ठेवले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. तशी शक्यता लक्षात घेऊन तुरुंगात आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. मुंबईवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडलीचा राणा हा जवळचा साथीदार आहे. राणाला विशेष विमानाने भारतामध्ये गुरुवारी आणण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अमेरिकेने राणाच्या प्रत्यार्पणाविरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर त्याचे भारताकडे होणारे प्रत्यार्पण निश्चित झाले आहे.

तहव्वूर राणा कोण?

पाकिस्तानात स्थायिक असताना राणा तेथील लष्करामध्ये वैद्याकीय विभागात कार्यरत होता. त्याने १९९० मध्ये पाकिस्तानी लष्करातील नोकरी सोडली. त्यानंतर राणाने कॅनडाचे नागरिकत्त्व स्वीकारले. त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. डेविड हेडलीने भारतात टेहळणी केली त्यावेळी त्याने थेट पाकिस्तानात दूरध्वनी करणे टाळले. त्याऐवजी हेडली राणाशी संपर्क साधून माहिती द्यायचा. ही माहिती पुढे राणाकडून पाकिस्तानातील हल्ल्याच्या सूत्रधारांना पुरवली जायची.

राणाचा पाकिस्तानशी संबंध नाही

इस्लामाबाद: ‘मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्याशी आमचे काहीही देणेघेणे नाही,’ असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. राणा हा कॅनडाचा नागरिक असून, त्याने पाकिस्तानशी संबंधित कागदपत्रांचे २० वर्षांहून अधिक काळ नूतनीकरण केलेले नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते शाफकत अली खान यांनी दिली. राणाचा जन्म पाकिस्तानमध्ये १९६१ मध्ये झाला असून, त्याने पाकिस्तानी लष्कराच्या वैद्याकीय विभागात काम केले आहे. १९९०च्या दशकात तो कॅनडात स्थलांतरित झाला. तेथे त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले.

सचदेवा राणाचे वकील

‘एनआयए’ने राणाला पटियाला हाऊस न्यायालयात हजर केले. राणा दिल्लीत पोहोचल्याची बातमी मिळताच वरिष्ठ वकील दयान कृष्णन आणि ‘एनआयए’चे प्रतिनिधित्व करणारे विशेष सरकारी वकील नरेंद्र मान हे पटियाला हाऊस न्यायालयाच्या आवारात पोहोचले. दिल्ली सेवा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा राणाची बाजू न्यायालयात मांडली.

पतियाळा न्यायालयाबाहेर कडक बंदोबस्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पतियाळा हाउस न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राणाला भारतात आणल्यानंतर न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे. निमलष्करी दलातील जवान आणि दिल्ली पोलिस न्यायालयाबाहेर तैनात करण्यात आले आहेत. न्यायालयात येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे.

२६/११चा हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यात १६४ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईत नऊ दहशतवादी ठार झाले.

हा हल्ला करणाऱ्या १० पैकी एक दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यात आली. नोव्हेंबर २०१२मध्ये कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगातच फाशी देण्यात आली.

घटनाक्रम

१३ जानेवारी २००९ : कसाब, दोन भारतीय फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमदविरुद्ध खटला चालविण्यासाठी एम.एल. तहलियानी यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती.

१६ जानेवारी : आर्थर रोड कारागृहाची सुनावणीचे ठिकाण म्हणून निवड.

२५ फेब्रुवारी : आरोपपत्र दाखल

२७ ऑक्टोबर : मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणा आणि कटकारस्थानांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा जवळचा सहकारी याला अमेरिकेच्या एफबीआयने अटक केली.

११ नोव्हेंबर : एनआयएकडून दिल्लीत हेडली, राणा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल.

६ मे २०१० : मुंबईतील विशेष न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली. फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता.

९ जानेवारी २०११ : अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाने राणाला दोषी ठरविले.

२१ फेब्रुवारी : कसाबची फाशीची शिक्षा कायम.

२४ डिसेंबर : विशेष न्यायाधीश, एनआयए, पतियाळा हाऊस, नवी दिल्ली यांच्या न्यायालयात आरोपपत्र सादर. राणाच्या प्रत्यार्पणाची अमेरिकेला विनंती.

२९ ऑगस्ट २०१२ : सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

नोव्हेंबर : भारताच्या राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला

● २१ नोव्हेंबर : कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी.

२१ जानेवारी २०२५ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा राणाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार.

१३ फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रत्यार्पणाला मान्यता .

७ एप्रिल : राणाची फेरविचार याचिका फेटाळली

१० एप्रिल : राणाचे प्रत्यार्पण.