एसटीचा संचित तोटा २०० कोटींवर पोहोचला आहे. कर्मचाऱ्यांची थकबाकी एसटीने चुकती केली आहे. त्यामुळे आता चालक-वाहक यांनी जबाबदारी ओळखून प्रवासी संख्या वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा. वाहकांनी तर प्रत्येक फेरीत एसटीच्या क्षमतेपेक्षा किमान पाच प्रवासी जास्त घ्यायला पाहिजेत.. हा सल्ला कोणत्याही कामगार संघटनेच्या पुढाऱ्याने दिला नसून एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी दिला आहे. विशेष म्हणजे विनाअपघात २५ वर्षे गाडी चालवणाऱ्या चालकांच्या सत्कार समारंभात त्यांनी हा सल्ला दिला. एसटीची सर्व प्रशासकीय सूत्रे हाती असलेल्या अधिकाऱ्याने हा असा नियमबाह्य सल्ला दिल्यामुळे उपस्थित अधिकारी व मंत्रीही चक्रावले.
एसटी महामंडळाचे प्रवासी भारमान गेल्या दोन वर्षांत कमालीचे घसरले आहे. त्यातच डिझेल दरवाढीमुळे एसटीला आर्थिक फटका बसत असतो. कामगार करारामुळेही एसटीवर आर्थिक बोजा पडला. एसटी महामंडळाने बुधवारीच कामगार करारातील उर्वरित थकीत रक्कम कामगारांना देऊ केली. त्यानंतर गेली २५ वर्षे विनाअपघात गाडी चालवणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यासाठी आयोजिलेल्या समारंभात एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी एसटीची ही आर्थिक स्थिती कर्मचाऱ्यांसमोर मांडली. एसटी महामंडळाला २०० कोटींचा संचित तोटा आहे. कामगारांची सर्व थकबाकी महामंडळाने चुकती केली आहे. एसटीचे प्रवासी भारमान घटत आहे. ते वाढवण्याची जबाबदारी चालक-वाहक यांचीच आहे. त्यामुळे ही जबाबदारी ओळखून प्रत्येक वाहकाने आता आपल्या गाडीत क्षमतेपेक्षा किमान पाच प्रवासी जास्त घ्यावेत, अशी सूचना खंदारे यांनी दिली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीतून नेणे, हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे आहे. अनेकदा अशा गाडय़ांवर कारवाईदेखील केली जाते. एवढेच नाही, तर ज्या खासगी वाहतुकीवर एसटी अधिकारी टीकास्त्र सोडतात, त्या खासगी गाडय़ांमधूनही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून नेतात. अशा वेळी उपाध्यक्षांनी अशी सूचना देणे कितपय योग्य आहे, असा प्रश्न आता चालकांना पडला आहे. दुसरी बाब म्हणजे, प्रवासी भारमान गडगडले असताना एसटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढणार कुठून, अशी खिल्लीही उडवली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा