लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : दीड लाख गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत असून या कामागरांना घरे देण्यासाठी अद्यापही कोणती ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आता लवकरात लवकर राज्य सरकारने दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी एनटीसी गिरण्यांच्या जमिनी आणि एनटीसीची काळाचौकी येथील उर्वरित २२ हजार चौरस मीटर जागा ताब्यात घ्यावी, सात गिरण्याची कायदेशी मिळणारी जागा म्हाडाकडे हस्तांतरित करून गृहनिर्मितीला सुरुवात करावी, अशी मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीने केली. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने संघर्ष समितीने गिरणी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ही मागणी करण्यात आली.

दादर (पूर्व) येथील मराठी ग्रंथसंग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता गिरणी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मोठ्या संख्येने गिरणी कामगार उपस्थित होते. दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी १५ मार्च रोजी राज्य सरकारने धोरण जाहीर केले आहे. या धोरणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आणखी वाचा-मुंबई : आयपीएस अधिकारी रहमान यांची निवडणूक लढण्याची शक्यता धूसर?

ठाण्यातील सुमारे १२ हेक्टर जमिनीबाबत कायदेशीर पूर्तता पूर्ण करण्यात आली आहे. मात्र या जागेवर घरबांधणी सुरू झालेली नाही. या गृहबांधणीला लवकरात लवकर सुरुवात करावी. खटाव मिल, बोरिवली येथील ४० एकर जमिनीचा निवाडा मालकांच्या म्हणजेच विकासक मॅरथॉन यांच्या बाजूने झाला आहे. ती ही जागा नियमाप्रमाणे शासनाने ताब्यात घेऊन गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take concrete steps to house remaining mill workers demand of mill workers on labor day mumbai print news mrj