लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमध्ये सध्या सिमेंट काँक्रिट रस्ते बनविण्याची कामे व्यापक स्वरूपात सुरू आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र, ही टीका सकारात्मकपणे घ्यावी, संधी व आव्हान म्हणून तिच्याकडे पाहावे, अशी सूचना मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी पालिका यंत्रणेला केली. सध्या सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली, तर खड्डे पडण्याच्या समस्येचे प्रमाण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर होईल. मुंबईकरांना सुखद अनुभव मिळेल, असेही ते म्हणाले.
मुंबईत सध्या सुरू असलेल्या रस्ते काँटीकरणाच्या कामांचा भूषण गगराणी यांनी शुक्रवारी कंत्राटनिहाय आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे यांच्यासह संबंधित अधिकारी, कंत्राटदारांचे प्रतिनिधी, विविध सेवा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काँक्रिटीकरणाची कामे अधिक गतीने करताना गुणवत्तेशी तडजोड कदापि खपवून घेतली जाणार नाही. त्यादृष्टीने अधिक सजग राहावे, असेही निर्देश गगराणी यांनी यावेळी दिले.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने रस्ते काँक्रिटीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ किलोमीटर) तर, दुसऱ्या टप्प्यात एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ किलोमीटर) काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे.
ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. रस्ते कामांसाठी ९ कंत्राटदार नेमण्यात आले असून त्यांच्या कामाच्या प्रगतीत फरक आहे. काही कंत्राटदार अपेक्षित गतीने, तर काही कंत्राटदार धीम्या गतीने कामे करीत आहेत. त्याअनुषंगाने या बैठकीत कंत्राटदारनिहाय आढावा घेत ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे पूर्णत्वास गेली पाहिजेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले.
कंत्राटदारांना कारवाईचा इशारा
३१ मे २०२५ नंतर एकही रस्ता अपूर्ण अवस्थेत आढळला तर संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल. अजूनही दोन महिन्यांचा कालावधी हातात आहे. सुरू असलेली कामे या कालावधीत पूर्ण करणे शक्य आहे. रस्ते कामे सुरू असताना कंत्राटदारांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता रोधक (बॅरिकेड), प्रदूषण टाळण्यासाठी हिरवे कापडी आच्छादनाचा (ग्रीन नेट) वापर करावा. कंत्राटदार दुर्लक्ष करीत असेल किंवा जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी करीत असेल, तर कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असाही इशारा गगराणी यांनी दिला.
पूर्व उपनगरात कामाची गती कमी
पूर्व उपनगरांमध्ये पहिल्या टप्प्यातील काँक्रीट कामांची गती अत्यंत मर्यादित आहे. कंत्राटदाराने कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास कंत्राट काढून घेण्याचा आणि कठोर कारवाई करण्याचा निर्वाणीचा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला. ज्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्यांवर थर्मोप्लास्ट, झेब्रा क्रॉसिंग, कॅट आयज, चौकांमध्ये पिवळ्या थर्मोप्लास्ट रंगाचे ग्रीड बसविणे इत्यादी कामे पूर्ण करावीत, असेही गगराणी यांनी सांगितले.
अभियंत्यांना इशारा
कंत्राटदारांना जाणवणाऱ्या समस्यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करताना जर देयकांची रक्कम विनाविलंब मिळाली, तर कामांची गती राखण्यास मदत होते. त्यामुळे देयके विनाविलंब अदा करावीत, अशी विनंती कंत्राटदारांनी केली. देयके जर अकारण प्रलंबित ठेवली तर अभियंत्यांना वैयक्तिक जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असाही इशारा आयुक्तांनी दिला.