मुंबई : मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉल’ विभागात हजारो विद्यार्थी नोकरी सांभाळून शिक्षण घेत आहेत. ‘आयडॉल’ विभागातील पदव्युत्तर द्वितीय वर्ष व्यवस्थापन अभ्यासक्रमाची (एस.वाय.एम.एम.एस) तृतीय सत्र परीक्षा ८ ते १७ जून २०२३ या कालावधीत होणार आहे. परंतु अद्यापही विद्यार्थ्यांना काही विषयांचे अध्ययन साहित्य कोणत्याही स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेले नाही. याचसोबत कामांच्या दिवसांमध्ये परीक्षेचे आयोजन केल्यामुळे नोकरीवर परिणाम होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून, सदर परीक्षा सुट्टीच्या दिवसांमध्ये घेण्याची मागणी विद्यार्थ्यांसह युवा सेनेने केली आहे.
‘आयडॉल’ विभागात व्यवस्थापन अभ्यासक्रमाची सुरुवात अलीकडेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये झाली. यामुळे अध्ययन साहित्याअभावी विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ‘व्यवस्थापन अभ्याक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी परीक्षा शनिवार-रविवार अशा सुट्टीच्या दिवसांमध्ये घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु आता परीक्षा रविवारच्या एका सुट्टीचा अपवाद वगळता सलग ९ दिवस घेण्यात येणार असल्यामुळे, नोकरीवर परिणाम होईल. त्यामुळे सदर परीक्षा सुट्टीच्या दिवसांमध्ये घ्यावी. उर्वरित पाठयपुस्तके लवकर उपलब्ध करून द्यावी. आमच्याकडून ५९ हजार १२४ रुपये प्रवेश शुल्क घेण्यात आले आहे. मग अध्ययन साहित्य वेळेत का देण्यात आले नाही?, असे एका विद्यार्थिनीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई : एका महिन्यात ई-शिवनेरीची दोन कोटी रुपयांची कमाई
‘आयडॉल विभागातील पदव्युत्तर द्वितीय वर्ष व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या (एस.वाय.एम.एम.एस) तृतीय सत्र परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून, सदर परीक्षा ही शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी ‘आयडॉल’ विभागाच्या संचालकांना पत्र देऊन केली आहे. संचालकांनीही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे’, असे युवा सेनेचे सह-सचिव ॲड. संतोष धोत्रे आणि परशुराम तपासे यांनी सांगितले.
उर्वरित अध्ययन साहित्य लवकरच उपलब्ध करणार
‘आयडॉल’ विभागातील विविध अभ्यासक्रमांचे ९९ टक्के अध्ययन साहित्य हे छापील व ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहे. द्वितीय वर्ष व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या ९ विषयांपैकी ७ विषयांचे अध्ययन साहित्य उपलब्ध आहे. तर उर्वरित २ विषयांची पाठयपुस्तके https://old.mu.ac.in/study-material-semester-pattern/ या अधिकृत संकेतस्थळावर आणि छापील स्वरूपात लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक सत्रामध्ये जसजसा अभ्यासक्रम शिकविला जातो, त्याप्रमाणे पाठयपुस्तकांची निर्मिती होते. या सत्रानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. तर अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी परीक्षा घेण्यात येईल असे सांगण्यात आलेले नाही, कारण ते अशक्य आहे. परंतु तरीही परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉल’ विभागाच्या संचालकांनी स्पष्ट केले.