महाराष्ट्र टोलमुक्तीसाठी सर्वाना उपयुक्त ठरेल अशी योजना राबवण्याचा विचार असून सत्तेत आल्यानंतर टोलमुक्तीसाठी ‘वन टाइम टॅक्ससारखा’ पर्याय राबवण्याचा प्रयत्न आम्ही करू. गाडय़ांच्या किमतीतून टॅक्स घेतल्यास त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होणार नाही. शिवाय रोजची टोलची कटकटदेखील संपून जाईल, अशी भूमिका आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाण्यात घेतली.
कॉंग्रेसमुक्त भारतासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ इच्छित आहेत आणि कॉंग्रेसला सत्तेवरून खेचणे ही आमची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये आहोत. राज्यघटनेच्या संरक्षणाची भूमिका भाजपची राहणार आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी हिंदुत्वाचा राग आळवला. विरोधकांच्या प्रचारामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरत असून, लोकांना आपली व्यापक भूमिका व्यवस्थित समजावण्यासाठी अभियान हाती घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
येथील मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्धदेखील पूर्वीचे हिंदूच आहेत. एमआयएमसारख्या पक्षांच्या वतीने भडकावू विधाने करतात, त्यांनादेखील लढाऊ उत्तरे देण्याची आमची भूमिका आहे. मात्र एकमेकांच्या द्वेषाने काहीच साध्य होणार नाही.
आम आदमी पक्षाचा धोका आपल्याला होणार नसून त्याचा सर्वाधिक धोका कॉंग्रेसलाच आहे असा दावा आठवलेंनी केला.
पवारांनाच आमचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीन झाली तरी भविष्यात त्यांचे सरकारच येणार नाही, त्यामुळे पवार पंतपधान होण्याचा प्रश्नच नाही, असे विधान आठवले यांनी केले. भविष्यात महायुतीच विजयी ठरणार असून वेळ आल्यास आम्हीच पवारांना प्रस्ताव देऊ असे विधान आठवले यांनी यावेळी केले.
देवयानींचे स्वागत करणार
देवयानी खोब्रागडे यांना आपले समर्थन असून १४ जानेवारी रोजी त्या मुंबईत दाखल होणार असून, आरपीआयच्या वतीने आम्ही त्यांचे जाहीर स्वागत करणार आहोत, असे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

Story img Loader