लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. ही लस चार प्रकारच्या इन्फ्लूएंझापासून संरक्षण करत असल्याने या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतात ऑगस्टपर्यंत १५ हजार जणांना इन्फ्लूएंझाची लागण झाली असून, यातील २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवाळ्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. साधारणपणे इन्फ्लूएंझाचा सर्वाधिक त्रास हा ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो. वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे.
आणखी वाचा-राज्यात ‘पॅलिएटिव्ह केअर’ सेवेच्या विस्ताराची गरज!
इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो. हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही लस घेण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये एच१एन१ इन्फ्लूएंझा विषाणू वाढत असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.
लस कधी घ्यावी?
इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये या लशीची किंमत नियंत्रित नसल्याने प्रति डोस १८०० ते २००० रुपये नागरिकांना मोजावे लागतात.