आ. बाळा नांदगावकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बारावी (विज्ञान) अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल लोकप्रधिनिधींनीही घेतली असून काहीजणांनी विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांकडे मांडण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी पत्र लिहून बारावीच्या आतापर्यंत शिकवून झालेल्या अभ्यासक्रमावर आधारलेले प्रश्नच परीक्षेत विचारण्यात यावेत किंवा शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण शिकविण्यासाठी दोन महिन्याचा अवधी द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री व शालेय शिक्षण विभागाकडे केल्या आहेत.
मात्र, आ. नांदगावकर यांच्या या सूचना अंमलात येणे अंमळ कठीणच आहे. मुळात प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात आतापर्यंत शिकवून झालेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाण वेगवेगळे आहे. त्यापैकी सर्वाना पचेल असा अभ्यासक्रम मंडळाने कसा निवडायचा असा प्रश्न आहे. बारावीची परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्याची मागणी तर बिलकुल व्यवहार्य नाही. कारण, बारावीची परीक्षा झाल्यानंतरचे दोन महिने विद्यार्थ्यांना नीट, जेईई, राज्य सरकारची सीईटी या प्रवेश परीक्षांची तयारी करायची आहे.
त्यामुळे, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा पर्यायही व्यवहार्य ठरत नाही.
नांदगावकरांनी आपल्या पत्रात राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांना ‘राष्ट्रीय निर्बुद्ध पुरस्कार’ देण्याची मागणी करून करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाविषयी नांदगावकर यांना असलेली तळमळ या पत्रातून व्यक्त होत असली तरी त्यांच्या सूचना बारावीच्या विद्यार्थ्यांना आगीतून फुफाटय़ात टाकणाऱ्या आहेत.

Story img Loader