मुंबई : काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची क्रूरपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय पक्ष पाकिस्तानला धडा शिकवण्याची भूमिका मांडत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि दहशतवादाविरोधात शिवसेनेनेही (ठाकरे) गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय’ असा ठळक आशय असलेल्या फलकावर स्वाक्षरी मोहीम घेऊन त्याबाबत लोकमत गोळा करण्यात येत आहे. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तसेच, आंदोलनेही करण्यात येत आहेत. दहशतवाद्यांविरोधात भारत सरकारनेही कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून पाकिस्तानवर विविध निर्बंध लादून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
काश्मिरमधील दहशतादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनेही (ठाकरे) महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. तसेच, ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय’ असा ठळक आशय असलेल्या फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वाक्षरी मोहिमेसाठी रेल्वे स्थानक परिसर, तसेच बाजारांच्या दर्शनी भागात फलक लावण्यात आले आहेत.
गेल्या दोन दिवसांत करण्यात आलेल्या आंदोलनातून दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. जनतेच्या मनात असलेला राग, प्रतिशोध घेण्याची भावना आणि पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग व्हायलाच पाहिजे, ही मागणी ठामपणे मांडण्यात आली. देशावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगात आम्ही भारत सरकारसोबत ठाम उभे आहोत. दहशतवादाविरोधात जो काही निर्णय केंद्र सरकार घेईल, त्याला आमचा पाठिंबा आहे. दहशतवाद्यांचा कणा आता मोडलाच पाहिजे, अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ समाजमाध्यावरून राग व्यक्त केला.