मुंबई : शरीरयष्टी पिळदार करण्यासाठी अनेक तरुण सप्लिमेंट्स घेण्याला प्राधान्य देतात. मात्र अनियंत्रित सप्लिमेंट्स घेतल्याने मूत्रपिंडावर (किडनी) परिणाम होत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. अशाच प्रकारे अनियंत्रित सप्लिमेंट्स घेणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाच्या मूत्रपिंडावर परिणाम झाला, मात्र मुंबईतील डॉक्टरांनी यावर तातडीने उपचार केल्याने या तरुणाचे प्राण वाचले.
मुंबईतील २७ वर्षीय तरुणाला काही दिवसांपूर्वी अचानक मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला. त्याला थकवा, फसफसणारे मूत्र अशा समस्या जाणवू लागली. त्याने मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील क्रिटिकल केअर नेफ्रॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. रुषी देशपांडे यांच्याकडे उपचार सुरू केले. काही चाचण्या केल्यानंतर या तरुणाची क्रिएटिनिनची पातळी वाढल्याची लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी आणखी काही तपासण्या केल्या, तसेच त्याचे समुपदेशन केल्यावर तो अनेक दिवसांपासून कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय अनियंत्रित सप्लिमेंट्स घेत असल्याचे स्पष्ट झाले. जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन, सप्लिमेंट आणि स्टिरॉइड्सच्या वापरामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊन त्याला हानी पोहोचली होती.डॉक्टरांनी त्याला तातडीने सर्व सप्लिमेंट्स बंद करण्याची सूचना करीत त्याच्यावर उपचार सुरू केले. उपचाराअंती रुग्णाची मूत्रपिंड कार्यक्षमता ३० दिवसांत पूर्ववत झाली. तीन महिन्यांच्या पाठपुराव्यामध्येही मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत कोणताही बिघाड आढळला नाही.
करण्यात येणार उपचार
उपचार योजनेंतर्गत सर्व सप्लिमेंट्स त्वरित बंद करणे, पुरेशी हायड्रेशन सुनिश्चित करणे आणि मूळव्याधीसाठी प्रचलित असलेली नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स टाळणे यांचा समावेश होता. हे औषध खेळाडूंमध्ये स्नायू वेदना कमी करण्यासाठी वापरले जात असले तरी, त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यावर अधिक विपरीत परिणाम होऊ शकतो, असे डॉ. रुषी देशपांडे यांनी सांगितले.
सप्लिमेंट्सच्या अतिवापराचे दुष्परिणाम
शरीरयष्टी पिळदार करण्यासाठी तरुणांकडून प्रोटीन, सप्लिमेंट आणि स्टिरॉइड्सचा अतिवापर केला जातो. त्यामुळे मूत्रपिंडावर ताण पडून ते अचानकपणे कार्य करणे थांबवते. यामुळे रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर होण्याची प्रक्रिया थांबते. परिणामी मूत्रपिंड निकामी होते.
सप्लिमेंट्स वापरापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
अनियमितपणे आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्सचा वापर केल्याने मूत्रपिंडाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. सप्लिमेंट्स वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. रुषी देशपांडे यांनी स्पष्ट केले.