मोठय़ा प्रतीक्षेनंतर आलेल्या आमिर खानच्या ‘तलाश’ने त्याच्याच ‘थ्री इडियट्स’चा विक्रम मोडीत काढला आहे. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियट्स’ने पहिल्या तीन दिवसांत ४० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता. तर ‘तलाश’ने हा टप्पा पार करत शुक्रवार ते रविवार या दरम्यान ४८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र ‘थ्री इडियट्स’ने जमा केलेल्या एकूण गल्ल्याचा विचार करता ‘तलाश’ला अजून खूप मोठी मजल गाठायची आहे. ‘थ्री इडियट्स’ने २०२ कोटींचा धंदा केवळ भारतात केला होता. असे असले, तरी ‘जब तक है जान’च्या तुलनेत ‘तलाश’ची पहिल्या तीन दिवसांची कमाई कमी आहे.
प्रदर्शित झाल्या झाल्या ‘तलाश’ एकूण चित्रपटगृहांच्या ६० टक्के गल्ला जमा करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी बांधला होता. हा अंदाज खरा ठरवत ‘तलाश’ने पहिल्या दिवशी १४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पहिल्या दिवशी छोटय़ा चित्रपटगृहांमध्ये ‘तलाश’ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कमाईवरही झाला. मात्र एकाच वेळी शेकडो स्क्रीन्सवर तो प्रदर्शित झाल्याने चित्रपटाला दुसऱ्या दिवशी १५.५ कोटी रुपयांची कमाई मिळाली. मात्र ‘तलाश’ने रविवार खऱ्या अर्थाने गाजवला. या एका दिवसात ‘तलाश’ने १८.५ कोटींची कमाई करत तीन दिवसांची कमाई ५० कोटींच्या आसपास नेली.
या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि समीक्षकांनी केलेले समीक्षण पाहता, हा चित्रपट सर्व लोकांच्या पसंतीला उतरेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल, याबाबत निश्चितपणे सांगणे कठीण आहे. हा चित्रपट ९० कोटींच्या आसपास कमाई करेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader