मुंबई : तलाठी भरतीविरोधात आक्रमक भूमिका घेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पश्चिम रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकात लोकल रोको आंदोलन केले. यावेळी बोरिवलीला जाणारी लोकल रोखून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच याप्रकरणाची सखोल एसआयटी चौकशीची मागणी काॅंग्रेसने केली. दरम्यान घटनास्थळी आरपीएफ आणि रेल्वे पोलीस दाखल होऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> माजी मंत्री रवींद्र वायकर चौकशीला अनुपस्थित
तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास दादर स्थानकातील फलाट क्रमांक १ वर आलेली बोरिवली लोकल अडवली. तलाठी भरती प्रक्रियेतील घोटाळ्याची सखोल एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेवर चढून, रुळावर उतरून रेल रोको केले. रेल्वे पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समजूत काढणाचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते. या आंदोलनामुळे दादर रेल्वे स्थानकात एकच गोंधळ झाला. आंदोलकांना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांसह आरपीएफ जवान स्थानकात दाखल झाले. यावेळी सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर लोकल बोरिवलीला रवाना झाली.