पाकिस्तानातील तालिबान्यांचा प्रमुख हकिमुल्ला मेहसूद अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात नुकताच ठार झाला. त्याचवेळी, पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हक्कानी यांनी आपल्या ‘मॅग्निफिशंट डिल्यूजन्स’ या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले. तसेच, काश्मीर प्रश्न सोडविण्याची अमेरिकेने दिलेली संधी पाकिस्ताननेच कशी घालवली, हेही त्यांनी सागितले होते. तालिबान्यांचा नवा प्रमुख, त्याच्या कारवाया, अमेरिकेची दुटप्पी भूमिका, पाकिस्तानातील धोकादायक मूलतत्त्ववाद, अमेरिकेशी त्यांचे ताणले गेलेले संबंध आदी बाबींचा ‘भारताचा अशांत शेजार’ या भूमिकेतून घेतलेला वेध..
मुल्ला फझलुल्लाह : पाकिस्तानी तालिबान्यांचा नवा चेहरा
हकिमुल्ला मेहसूद याच्यानंतर पाकिस्तानी तालिबान्यांची सूत्रे कोणाकडे जाणार याबाबत प्रसारमाध्यमे, सामरिक तज्ज्ञ आणि सुरक्षा यंत्रणांमधील अधिकारी यांचे बरेच तर्क-वितर्क सुरू होते. मात्र वर्णी लागली ती ‘मुल्ला रेडिओ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुल्ला फझलुल्लाह याची. एफएम रेडिओवरून अत्यंत जहाल भाषणे करण्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘मुल्ला रेडिओ’ २००७ पासून स्वात खोऱ्यातील मुलींच्या नृशंस कारवायांसाठी कुख्यात आहे. मलाला युसुफजाई हिच्यावरील हल्ला करण्याची योजनाही त्याचीच. २००९ मध्ये अमेरिकेच्या फौजांनी हल्ला केल्यावर फझलुल्लाहने अफगाणिस्तानात पलायन केले होते, आणि तेथून तो सूत्रे हलवीत होता.
अमेरिकेशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये तणाव
पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले ‘आर्थिक, सामरिक आणि लष्करी’ क्षेत्रामधील मैत्रीपूर्ण संबंध हकिमुल्ला मेहसूद याच्यावर केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे ‘ताणले’ गेल्याची भावना पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केली. अमेरिकेने आम्हाला विश्वासात न घेता हल्ले करणे हा आमच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आहे, यामुळे लोकभावना दुखावल्याची प्रतिक्रिया शरीफ यांनी व्यक्त केली. ‘आम्हाला मैत्री टिकवतानाच या बाबींचाही विचार करावा लागेल’, असा धमकीवजा नाराजीचा सूर त्यांनी लावला.
मारला गेलेला प्रत्येक सजीव ‘शहीद’च!
पाकिस्तानी तालिबान्यांचा म्होरक्या हकिमुल्ला मेहसूद अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. त्याचा ‘शहीद’ म्हणून गौरव करतानाच ‘जमैत उलेमा ए इस्लाम’ या राजकीय पक्षाचा प्रमुख फझलुर रेहमान याने अमेरिकेच्या हल्ल्यांत ठार झालेला प्रत्येक पाकिस्तानी नागरिक इतकेच नव्हे तर अगदी कुत्रासुद्धा शहीद म्हणूनच गणला जाईल, अशी उद्दाम भूमिका घेतली.
अमेरिकेची ‘सौदेबाजी’
‘काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय प्रश्न असून तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी चर्चेद्वारे सोडवावा’ या भारताच्या भूमिकेचे जाहीर समर्थन करणाऱ्या अमेरिकेने लादेनला मारल्यानंतर मात्र पाकिस्तानशी सौदेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांच्या ‘मॅग्निफिशंट डिल्यूजन्स’ या पुस्तकात हा मजकूर उघड केला आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी आम्हाला सहकार्य केले नाहीत तर तुम्हाला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करू’ अशी धमकी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेम्स जोन्स यांनी अली झरदारी यांना दिली होती. दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये अमेरिकेला सहकार्य केले तर काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी भारताला राजी करू, असा प्रस्तावही ओबामा प्रशासनाने २००९ मध्ये पाकिस्तानसमोर ठेवला होता. ११ नोव्हेंबर, २००९ रोजी ओबामा यांचे पत्र घेऊन स्वत जोन्स झरदारी यांना भेटायला आले होते, असा दावा हक्कानी यांनी केला आहे.