दहशतवादावरून सरसकट हिंदूना दोष देण्याचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा प्रयत्न उचित नाही, अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी त्यांना ‘लक्ष्य’ केले. त्याचवेळी २००५मध्ये तालिबानी नेता फझल उर रेहमान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदु परिषदेच्या नेत्यांची गुप्तपणे बैठक घेतली होती, असा आरोप करत राष्ट्रवादीने संघ व भाजपवरही निशाणा साधला.
शिंदे यांच्या वक्तव्यावरून भाजपने देशभर आंदोलन केले. पण भाजप आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांनी तालिबानी नेत्यांबरोबर केलेल्या चर्चेत काय शिजले, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. तालिबानी नेता फझलउर रेहमान हा २००५ मध्ये भारत भेटीवर आला असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांची त्याने भेट घेतली होती. अडवाणी हे तेव्हा विरोधी पक्षनेते असल्याने राजनैतिक पातळीवर ही भेट झाली असे एकवेळ मान्य करता येईल; पण या तालिबानी नेत्याने नवी दिल्लीतील रा. स्व. संघाच्या झंडेवाला कार्यालयात संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांशी गुप्त चर्चा केली होती. या चर्चेत काय शिजले हे संघाच्या नेत्यांनी कधीच जाहीर केले नाही. तालिबानी नेत्याबरोबर काय गुप्तगू झाले हे जनतेला समजले पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केली. मौलाना फझल उर रेहमान याची भेट घेण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला. भाजपचे नवे अध्यक्ष राजनाथ सिंग हे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना भेटण्यासाठी गेले होते याकडेही मलिक यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे आरोप हे हास्यास्पद असून, रेहमान हा अडवाणी यांना विरोधी पक्षनेते म्हणून भेटला होता. २००५ मध्ये झालेल्या भेटीचे प्रकरम आता उकरून काढण्याचा प्रयत्न हा हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केली.
दहशतवादावरून एखादा धर्म, पंथ किंवा जातीला जबाबदार धरणे चुकीचे आहे. बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे घ्या, पण त्यांच्या धर्माला बदनाम करू नका, अशी भूमिका मांडीत राष्ट्रवादीने केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनाही लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा