लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : महालक्ष्मी येथील सर्वांत जुन्या धोबी घाटाजवळ सर्वांत उंच ४२ मजली पुनर्वसन टॉवरमध्ये झोपडीवासीयाना अलीकडेच घरांचा ताबा देण्यात आला. या प्रकल्पात १६ हजार झोपडीवासीय आहेत. या सर्वांसाठी सध्या पुनर्वसन टॉवरचे काम सुरू आहे.
साईबाबा नगर, महालक्ष्मी येथे पहिल्या टप्प्यातील हजार कुटुंबांना घराचा ताबा अलीकडे देण्यात आला. ओमकार रिअल्टी आणि पिरामल रिअल्टी यांच्यातील हा संयुक्त प्रकल्प असून प्रामुख्याने धोबीघाटात काम करणाऱ्या बहुतांश कामगारांचा या प्रकल्पात समावेश आहे. जागतिक वारसा लाभलेल्या धोबीघाटाचे सौंदर्य विचलित न करता हा प्रकल्प उभा राहत आहे. या चार टॉवर्समध्ये नामंकित कंपनीची अतिजलद १६ उद्वाहने बसविण्यात आली आहेत. कुठल्याही झोपु प्रकल्पात पहिल्यांदाच अशी अतिजलद उद्वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अलिकडेच ‘ओमकार भोईवाडा (परळ-शिवडी) या प्रकल्पात तीन हजार झोपडीवासीयांना घरांचा ताबा देण्यात आला.
आणखी वाचा-ऑगस्टमध्ये मुंबईतील १० हजारांहून अधिक घरांची विक्री
वरळी येथेही विकासकाने झोपडीवासींना उत्तुंग टॉवरमधील पुनर्वसनातील घरांचा ताबा दिला. मात्र तेथे उद्वाहन वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी करूनही विकासकाने काहीही केले नाही वा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानेही दखल घेतली नाही. आता महालक्ष्मी येथे ४२ मजली झोपु टॉवर उभा राहत आहे. परंतु उद्वाहनाची देखभाल नीट केली जात नाही. त्यामुळे बऱ्याच वेळी उद्वाहने बंद ठेवलेली असतात. उत्तुंग टॉवरमध्ये घर मिळाल्यामुळे झोपडीवासीय आनंदी असले तरी देखभाल कशी होणार या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.