प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तिनं नुकताच एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर तिने पुन्हा नाना यांना लक्ष्य केलं आहे.

नाना पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान मला त्रास दिला. नाना इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शूटिंग संपवून मी घरी निघाले त्यावेळी माझ्या गाडीवर दगडफेक केली. कुटुंबियांना त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे गंभीर आरोप तिने केले आहेत.

इंडस्ट्रीमधूनही कोणी माझ्या मागे उभं राहिल नाही. उलट पोलिसांनी आपल्याला मदत करण्याऐवजी आपल्या विरोधातच तक्रार दाखल करुन घेतली असे तनुश्रीने सांगितले. तनुश्री अमेरिकेत राहते पण सध्या ती भारतात आली आहे. #metoo मोहीमेबद्दल बोलताना तिनं नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केलं. #metoo मोहिम भारतात कधीही यशस्वी होऊ शकत नाही कारण लोक फक्त वादविवादाबद्दल बोलतात मात्र प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा लोक काहीच करत नाही असं ती म्हणाली. यावेळी तिनं ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान सेटवर तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच यावेळी केवळ बघ्याची भूमिका निभावली असंही ती म्हणाली. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इण्डस्ट्रीतल्या सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असं तनुश्री ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

अक्षय कुमार, रजनीकांत यांसारख्या मोठ्या कलाकारांनी नानांसोबत काम करणं थांबवलं पाहिजे. जर मोठ्या कलाकरांनी महिलांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या अशा लोकांसोबत काम करणं सुरूच ठेवलं तर #metoo मोहिम कधीही यशस्वी होऊ शकत नाही असंही तनुश्री म्हणाली.

Story img Loader