तनुश्री दत्ता- नाना पाटेकर प्रकरणात अखेर ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ म्हणजेच ‘सिंटा’नं आपलं मौन सोडलं आहे. तनुश्री दत्ता- नाना पाटेकर प्रकरणातील १० वर्षांपूर्वीचा निर्णय चुकीचाच होता त्यामुळे ‘सिंटा’नं या प्रकरणात तनुश्रीची माफी मागितली आहे मात्र आता तिला मदत करण्यास ‘सिंटा’नं असमर्थता दर्शवली आहे.
‘सिंटा’चे सरचिटणीस सुशांत सिंग यांनी मंगळवारी याप्रकरणात ‘सिंटा’तर्फे प्रतिक्रिया दिली आहे. २००८ मध्ये ‘हॉर्न ऑके प्लीज’ चित्रपटादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्या सोबत असभ्य वर्तन केलं असा आरोप तनुश्री दत्तानं केला. या संपूर्ण प्रकरणाची रितसर तक्रार तिनं १० वर्षांपूर्वी ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’कडे केली होती. मात्र त्यावेळी ‘सिंटा’नं आपल्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असाही आरोप तिनं नुकताच केला. या प्रकरणात काहीदिवस मौन धारण करून असलेल्या ‘सिंटा’नं अखेर तनुश्री दत्ताची माफी मागितली आहे.
‘महिला कलाकारासोबत कोणत्याही प्रकारचं असभ्य वागणूक, गैरवर्तन, अश्लिल शेरेबारी खपवून घेतली जाणार नाही. अशा वर्तणूकीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. ‘सिंटा’च्या कार्यकारी समीतीकडे तनुश्रीनं मार्च २००८ मध्ये तक्रार केली होती. त्यानंतर ‘सिंटा’ आणि आयएफटीपीसीची संयुक्त तक्रार निवारण समितीने याप्रकरणावर जुलै २००८ मध्ये निर्णय दिला. हा निर्णय चुकीचा होता. त्यात तिच्यासोबत केलेल्या असभ्य वर्तणूकीचा उच्चार देखील नव्हता ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे. मात्र त्यावेळी ‘सिंटा’च्या कार्यकारी समीतीवर वेगळे सदस्य होते. आता सदस्य बदलले आहे. तनुश्रीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सिंटाकडून आम्ही माफी मागतो, खरं तर माफी मागून तिला झालेला त्रास आम्ही कमी करू शकत नाही. पण तिच्यासोबत झालेला प्रकार अन्य कोणत्याही कलाकारासोबत घडणार नाही याची आम्ही पुरेपुर काळजी घेऊ. ‘ असं ‘सिंटा’नं म्हटलं आहे.
मात्र दुसरीकडे माफी मागणाऱ्या ‘सिंटा’नं याप्रकरणात १० वर्षांनंतर तिला मदत करण्यास असमर्थता दाखवली आहे. हे प्रकरण दहा वर्ष जूनं आहे. ‘सिंटा’च्या नियमानुसार फक्त ३ वर्ष जूने प्रकरणच आम्ही हाताळू शकतो, असं म्हणत ‘सिंटा’नं आपली असमर्थता दर्शवली आहे.