‘छावा’ चित्रपटानंतर अचानक आपल्या लोकांना इतिहासाबद्दलचा उमाळा दाटून आलाय. त्याआधी इतिहासाबद्दलची अनास्थाच सर्वत्र दिसत होती. आता अचानक औरंगजेबाची कबर राजकीय पक्षांच्या आणि हिंदुत्ववादी संस्थांच्या डोळ्यांत खुपू लागली आहे. याआधी माजी राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल याच संघटना आणि पक्षांनी डोळ्यांवर कातडे ओढून घेतले होते. तर ते असो. सध्या इतिहासाला आलेल्या बऱ्या दिवसांनी त्याबद्दलचे औत्सुक्य वाढले आहे. पण ते इतिहासाच्या अस्सल लिखाणाबद्दलचे आहे की काल्पनिक ललित इतिहासाबद्दल आहे यावर चर्चा, वादविवाद झडू शकतात. कारण बहुअंशी काल्पनिक, ललित कलांमध्ये चित्रित केलेल्या अभिनिवेशी इतिहासातच लोकांना जास्त रस दिसतो. त्याला इतिहासाभ्यासाचा कितपत आधार आहे हे पाहिले जात नाही. पुन्हा आपल्या इतिहास अभ्यासकांतही एकमत नाही. त्यांचे ग्रह, पूर्वग्रह, त्यांच्या लिखाणाला असलेला-नसलेला पुराव्यांचा आधार हेही त्यांच्या लिखाणात डोकावतं. त्यामुळे खरा इतिहास काय, हे संदिग्धच राहतं. तरीही ललित इतिहास आणि खरा इतिहास यांत अंतर हे असतंच. पण त्याबद्दल जाणीवजागृती नसल्याने सामान्यजन ललित कलाकृती याच इतिहासाचा आधार धरून तोच इतिहास मनाशी जोपासत असतात. इतिहासकारही समूहविवेकाच्या या दबावाला बळी पडून खरं काय ते सांगायला पुढे येत नाहीत. असो. नुकतंच श्री छत्रपती शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टने ‘रणरागिणी ताराराणी’ हे युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर आणलं आहे. त्यात संभाजी महाराजांच्या नंतरचा मराठेशाहीचा इतिहास चितारलेला आहे.

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाला वाटले की आता आपल्याला मराठेशाहीचा अंत करता येईल. पण त्याचं हे स्वप्न धुळीला मिळालं. संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज आणि राणी ताराराणींनी मराठ्यांचा लढा जारी ठेवला. त्यात संताजी-धनाजींसारखे शूरवीरही आघाडीवर होते. मात्र, त्याकरता मराठेशाहीत शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतनदारी पद्धती सुरू करून मावळ्यांना लढ्यास प्रवृत्त करावे लागले. आपल्या वतनासाठी तरी मावळे शत्रूवर तुटून पडतील, स्वराज्य राखतील हा हिशेब त्यामागे होता. फंदफितुरी, स्वार्थांधतेची कीड मराठेशाहीला लागलेली होतीच. पण ती दृष्टीआड करून राजाराम महाराज आणि ताराराणींनी औरंगजेबाविरुद्धचा लढा जारी ठेवला. अखेर २७ वर्षे मराठेशाहीशी लढूनही औरंगजेबाच्या हाती मराठ्यांचं राज्य काही आलं नाहीच. उलट त्याचाच इथल्या मातीत अंत झाला.

‘रणरागिणी ताराराणी’ हे नाटक हाच इतिहास मंचित करतं. पण नाटकाच्या नावाप्रमाणे ताराराणींचा पराक्रम त्यात प्राधान्याने आलेला नाही. जवळजवळ पाऊण नाटक झाल्यावर ताराराणीसाहेब मराठेशाहीची सूत्रं हाती घेतात आणि त्यांचा मग त्रोटक इतिहास रंगमंचावर सादर होतो. या अर्थाने या नाटकाचं शीर्षक त्याला न्याय देत नाही. मात्र, संभाजी महाराजांनंतरचा मराठेशाहीचा इतिहास बऱ्यापैकी यातून पुढे येतो. मराठ्यांनी औरंगजेबाशी दिलेली कडवी झुंज यात पाहायला मिळते. त्यासाठी आखलेली रणनीती, प्रसंगी घेतलेली माघार, औरंगजेबाच्या सरदारांत पाडलेली फूट, मराठे सरदार आणि त्यांचे राग-लोभ, त्यातून मराठेेशाहीत पडलेली फूट, राजाराम महाराजांचे अननुभवीपण, त्याचे मराठेशाहीला भोगावे लागलेले परिणाम, त्यांच्या पश्चात ताराराणीबाईंनी कंबर कसून औरंगजेबाविरुद्ध उभं ठाकणं… हा सगळा इतिहास या नाटकात यथार्थतेनं मांडलेला आहे. शिवाजी महाराजांनंतर मराठेशाहीला लागलेली घरघर, राजघराण्यात माजलेली बेदिली, त्यातून अवघ्या मराठी मुलखात पसरलेली निराशा आदी पार्श्वभूमी चित्रित करत नाटक पुढे सरकतं. औरंगजेबाच्या मावळत्या काळाचं चित्रण यात तपशीलवारपणे आलेलं आहे. दोन दशकांहून अधिक काळ मराठ्यांशी लढण्याने औरंगजेबाच्या फौजेत आलेली नैराश्याची आणि मरगळीची भावना, त्यातूून त्याची त्याच्या सैन्यावरील हळूहळू निसटत चाललेली पकड आणि मराठ्यांनी ती हेरून रचलेल्या चाली, आखलेली रणनीती यामुळे मराठेशाही औरंगजेबाशी दोन हात करू शकली. नाटकात हा इतिहास यथातथ्यतेनं आला आहे. औरंगजेबालाही ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असं वाटून आपला अंत जवळ आल्याची जाणीव होते, हे नेमकेपणानं नाटकात येतं.

लेखक युवराज पाटील यांनी संभाजी महाराजांनंतरचा इतिहास या नाटकाद्वारे मंचित केला आहे. पण शीर्षकात सुचवलं गेल्याप्रमाणे तो ताराराणींचा इतिहास नाही. त्यांचं त्रोटक चित्र यात आलेलं आहे. त्यांचा पराक्रम, त्यांनी योजलेली रणनीती, आखलेले डावपेच, त्याची परिणीती वगैरे भाग नाटकात येता तर त्या शीर्षकाला काही न्याय मिळाला असता. असो. पण मराठेशाहीचा इतिहास बऱ्यापैकी त्यांनी मांडला आहे. त्या घडवणाऱ्या- बिघडवणाऱ्या व्यक्ती, त्याने इतिहासाला मिळालेलं वळण, या वाटचालीत आलेले हर्ष-खेदाचे क्षण त्यांनी प्रत्ययकारीतेनं दाखवले आहेत. त्यासाठी त्यांनी उर्दूचा केलेला यथायोग्य वापर नाटकाला अस्सलता प्रदान करतो… प्रसंगांतली दाहकता वाढवतो. नाटकात राजाराम महाराज काहीसे दुबळे आणि अननुभवी दाखवले आहेत. संताजींना सेनापतीपदावरून काढून टाकण्यात त्यांची अदूरदृष्टीच दिसून येते. त्यांच्या पश्चात ताराराणी बाईसाहेबांचं खंबीर नेतृत्व ज्या प्रकारे यात समोर यायला हवं होतं त्या अर्थाने ते पुढे येत नाही. नाटकाच्या शेवटाकडे निरनिराळ्या सरदारांना वेगवेगळ्या मोहिमांवर पाठवणं एवढीच त्यांची भूमिका दिसते. त्यांनी स्वत: दाखवलेला पराक्रम इथे येतच नाही. त्यामुळे उत्तरार्धातील मराठेशाहीचा इतिहासच जास्तकरून मनावर ठसतो.

दिग्दर्शक विजय राणे यांनी ऐतिहासिक नाटकाची प्रकृती हेरून पल्लेदार संवादफेक, अभिनिवेशी वाटावी अशा प्रसंगमांडणीबरोबरच संभाजी राजांनंतर मराठेशाहीला आलेली उतरती कळा, त्याला तोंड देताना संबंधितांची झालेली कोंडी, त्यातून मार्ग काढण्याचे त्यांचे अकटोविकटीचे प्रयत्न, मराठा सरदारांना लढ्यास प्रवृत्त करण्यातली उर्जस्वल ओजस्वीता, औरंगजैबाची मावळतीची हतबलता वगैरे गोष्टी नेमकेपणानं सादरीत केल्या आहेत.

राजघराण्यातील अंतर्गत गोष्टी, त्यांतील ताणेबाणे, एकेक किल्ला लढवण्याची शिकस्त, रायगडावरील माघार, राजाराममहाराजांच्या जिंजीकडील प्रस्थानात आलेले अडथळे, पुन्हा जिंजीवरून स्वराज्यात परतताना करावी लागलेली तडजोड, औरंगजेबाचा हळूहळू होत गेलेला भ्रमनिरास आदी प्रसंग दिग्दर्शकाने रंगतदार केले आहेत. पण ज्या ताराराणींवर हे नाटक बेतलं गेलं आहे असा दावा नाटकात केला जातो त्या ताराराणीसाहेबांना संहितेत पुरेसा न्याय दिला गेलेला नाही ही गोष्ट त्यांनी लेखकाच्या निदर्शनास आणून द्यायला हवी होती. असो.

संदेश बेंद्रे यांनी ऐतिहासिक नाटकाला साजेशी नाट्यस्थळं वैविध्यपूर्ण नेपथ्यातून साकारली आहेत. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना नाट्यात्म प्रसंग उठावदार करते. अमीर हडकर यांचं संगीतही नाट्यपूर्णतेत भर घालतं. सिद्धांत घरत यांची साहसदृश्यं नेत्रदीपक आहेत. राहुल सुरते यांनी रंगभूषेतून आणि गणेश लोणारे आणि पूनम भागवत यांनी वेशभूषेतून पात्रांना बाह्यरूप प्रदान केलं आहे. सगळ्या कलाकारांनी आपापली कामं चोख केली आहे. ताराराणी झालेल्या तनिशा वर्दे यांनी त्यांची विजीगिषु वृत्ती, तडफ छान दाखवली आहे. येसूबाईंचा संयत, पण ठाम स्वभाव कृष्णा राजशेखर यांनी नेमकेपणानं टिपला आहे. राजाराममहाराजांचं अननुभवीपण अरुण पंदरकर यांच्या देहबोलीतून दिसून येतं. सुनील गोडसे यांनी मग्रुर, मुत्सद्दी आणि २७ वर्षांच्या मराठेशाहीविरुद्धच्या लढाईने थकलाभागलेला, तरीही पीळ कायम असलेला असा औरंगजेब उत्तम साकारला आहे. उमेश ठाकूर यांचा संताजी आणि हृषिकेश शिंदे यांचा धनाजी भाव खाऊन जातात. मुकूल देशमुख यांनी धिप्पाड देहाचा झुल्फिकार छान वठवला आहे. गणोजी झालेले निलेश नाईक एकाच प्रसंगात उठून दिसतात. सिद्धी घैसास (जानकीबाई), मोहिका गद्रे (झीनत), प्रसाद धोपट (असदखान), तेजस भोर (खंडोजी), चेतन मस्के (शंभूराजे) आदींनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत.