मुंबई : घारापुरी येथे झालेल्या बोटीच्या अपघातातून बजावलेल्या तरुण भाटीला (१४) बुधवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात आल्यापासून हा मुलगा आई-वडिलांना भेटण्याचा हट्ट करीत होता. तो सारखा अपघात विभागातून बाहेर पळून जात होता. अखेर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या आई – वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर मध्यरात्री तरूणची त्याच्या आईशी भेट घडवून आणण्यात डॉक्टरांना यश आले. आईची भेट झाली असली तरी गुरुवारी सायंकाळपर्यंत वडिलांचा शोध सुरू होता.
बोट अपघातामधील नऊ रुग्णांना सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. यामध्ये १४ वर्षांचा तरुणही होता. तरुण मालाडमध्ये वास्तव्यास असून, तो आई, वडील, चुलत भाऊ व वहिणीसोबत घारापुरी लेणी पाहण्यास गेला होता. अपघातानंतर बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास तरुणला सेंट जॉर्ज रुग्णालयात आणण्यात आले. तो एकटाच असल्याने प्रचंड घाबरला होता. त्याने आईकडे जाण्याचा हट्ट धरला होता.अखेर कर्तव्यावर असलेले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन बनसोडे यांनी त्याच्या आई, वडिलांचा शोध सुरू केला.
हेह वाचा…मुंबईची हवा खालावलेलीच, गारठा व प्रदूषकांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले
डॉ. बनसोडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दूरध्वनी करून तरुणची माहिती दिली आणि त्याचे आई, वडील बेपत्ता असल्याचे सांगितले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने बोट दुर्घटनेतील जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयांची माहिती दिली. त्यानुसार डॉ. बनसोडे यांनी सर्व रुग्णालयांशी संपर्क साधून तरूणच्या आई, वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, तरुणची आई गेटवे ऑफ इंडिया येथे असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. आई सुखरूप असल्याची माहिती डॉ. बनसोडे यांनी तरुणला दिल्यानंतर तो काहीसा शांत झाला. त्यानंतर रात्री १०.३० वाजता तरुणचे काका रमेश बोराणा सेंट जॉर्ज रुग्णालयात आले. यावेळी डॉक्टरांनी प्रथम तरुणच्या काकाची ओळख पटवून घेतली. त्यानंतर काकांनी तरुणचे आईशी बोलणे करून दिले. त्यानंतर काका तरुणला घेऊन आईला भेटण्यासाठी घेऊन गेले. डॉक्टरांच्या या प्रयत्नामुळे अखेर त्या मायालेकरांची भेट झाली. रुग्णालयात नऊ जणांना उपचारासाठी आणण्यात आले होते. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याने उपचारानंतर गुरुवारी सकाळपासून सर्वांना घरी सोडण्यात आले. डॉ विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय