मुंबई : टाटा रुग्णालयात दरवर्षी कर्करोगावर उपचारासाठी जवळपास चार हजारांहून अधिक मुले येतात. या मुलांच्या उपचारावरील खर्चाबरोबरच त्यांना सर्व प्रकारची मदत करून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी टाटा रुग्णालयाने सुरू केलेल्या इम्पॅक्ट संस्थेमुळे जवळपास ८० टक्के मुलांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली आहे. या मुलांवरील उपचारासाठी इम्पॅक्ट संस्थेमार्फत दरवर्षी ८० कोटी रुपये निधी सामाजिक दायित्वामधून उभारण्यात येत असल्याची माहिती इम्पॅक्ट संस्थेच्या प्रमुख शालिनी जाठिया यांनी दिली.
लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, दरवर्षी चार हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. तर दोन हजार मुले नियमित उपचार घेत आहेत. या मुलांमध्ये ल्युकेमिया आणि ल्युफोमा कर्करोगाचे प्रमाण अधिक असते. उपचारासाठी येणाऱ्या या मुलांवर प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यापूर्वी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कर्करोगग्रस्त मुले व त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य करण्यासाठी २००८ मध्ये इम्पॅक्ट संस्था सुरू करण्यात आली. बाल कर्करोग रुग्णांवरील किमोथेरपी, शस्त्रक्रिया या उपचाराबरोबरच त्यांना लागणारी औषधे, त्यांचे पुनर्वसन, त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी इम्पॅक्ट संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. ही संस्था टाटा रुग्णालयासह त्यांच्या सात संस्थांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या मुलांना आर्थिक सहाय्य करते. यासाठी विविध कंपन्यांच्या आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून इम्पॅक्ट संस्था निधी उभारण्याचे काम करते. दरवर्षी ही संस्था साधारणपणे ८० कोटी रुपयांचा निधी संकलित करते. या निधीतून आजपर्यंत टाटा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ८० टक्के मुलांचे आयुष्य सुकर करण्यात संस्थेला यश आले. मात्र यंदा या निधीपैकी फक्त ७० टक्के निधीच उभारणे शक्य झाले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राबविण्यात अडचणी येत असल्याची माहिती इम्पॅक्ट संस्थेच्या प्रमुख शालिनी जाठिया यांनी दिली.
हेही वाचा – वाहनचालकांच्या ५६ जागांसाठी भरती, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच संधी
इम्पॅक्टच्या वार्षिक दाता स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान उपस्थित दात्यांनी पुढे येऊन आर्थिक मदत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. रक्त कर्करोग असलेल्या बालरोग रुग्णांसाठी सीएआर – टी सेल उपचारपद्धती उपलब्ध करण्यात टाटा रुग्णालय आघाडीवर आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत टाटा रुग्णालयात हे उपचार फारच स्वस्त दरात होतात. सीएआर – टी सेल उपचारपद्धतीबाबत आखलेल्या १० वर्षांच्या कार्यक्रमामध्ये टाटा ट्रस्टने २०१७ मध्ये भरीव देणगी दिल्यानंतर या मोहिमेने वेग घेतल्याची माहिती सीएआर – टी सेल कार्यक्रमाच्या प्रभारी डॉ. गौरवी नरुला यांनी दिली.