मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्युटच्या डॉक्टरांनी कॅन्सर अर्थात कर्करोगावर एक खास औषध शोधल्याचा दावा केला आहे जे चौथ्या स्टेजचा मेटास्टेटिक कर्करोग बरा करु शकतं. मेटास्टेटिक कॅन्सर म्हणजेच कर्करोगाची चौथी स्टेज. या टप्प्यात कर्करोगाच्या पेशी एकमेकांपासून विलग होतात आणि शरीराच्या विविध भागांमध्ये पसरतात. याला चौथी स्टेज असं म्हटलं जातं. १० वर्षांच्या संशोधनानंतर अशी गोळी शोधण्यात आली आहे जी कर्करोगाचा धोका कमी करु शकणार आहे. अवघ्या १०० रुपयांना ही गोळी मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमका काय दावा करण्यात आला?

मुंबईतल्या टाटा इनस्टिट्यूटचे कॅन्सर सर्जन डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितलं की पेशींमध्ये मेटास्टेटिक कॅन्सर पसरण्याबाबत आम्ही १० वर्षे अभ्यास केला. मेटास्टेटिक कर्करोग का होतो ते आम्हाला समजलं. आम्ही जी केमोथेरेपी देतो त्याचे साईड इफेक्ट काय काय होतात? त्यावर आम्ही संशोधन केलं. डॉ. मित्रा यांनी यावर अभ्यास केला. माऊस मॉडेल म्हणजेच उंदरांवर केलेल्या प्रयोगांत असं लक्षात आलं की केमो थेरेपीचे साईड इफेक्ट कमी होतात. त्यानंतर मनुष्यावर प्रयोग करण्यात आले. ज्यामुळे केमोथेरेपीचे साईड इफेक्ट ३० ते ६० टक्के कमी होतात असं लक्षात आलं.

बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा केमोथेरेपीतला सर्वोच्च प्रकार मानला जातो. या प्रकारात रुग्णाला प्रचंड त्रास होतो कारण त्याच्या पेशी शून्य होतात. अशा प्रकारची केमो थेरेपी करायची वेळ येणार कशी नाही हेच आम्ही पाहतो. बऱ्याचदा कर्करोग रुग्णांना केमो सुरु केल्यावर तोंड येतं. तोंडाच्या आत फोड येतात. हा कॉमन साईड इफेक्ट आहे. या औषधामुळे हा साईड इफेक्ट कमी झाला. रेझ्वरेटॉल आणि कॉपर यांपासून तयार झालेली ही गोळी आहे. अँटी एजिंगसाठी रेझ्वरेटॉल वापरलं गेलं आहे. त्याचा परिणाम कॉपरसह जास्त प्रखरपणे होतो असं लक्षात आलं. त्या स्टेजपर्यंत जाऊ नये म्हणून ही गोळी गुणकारी ठरु शकते.

आम्ही जी गोळी घेऊन येत आहोत, त्याची किंमत फारच कमी आहे. या गोळीचा फायदा जास्त प्रमाणावर होऊ शकतो. मागच्या पाच वर्षांत नव्या उपचार पद्धती आल्या आहेत. ज्यामुळे कर्करोगाचा धोका ५ ते १० टक्के कमी होतो. मात्र त्या उपचार पद्धती एक लाखांपासून चार कोटींपर्यंत आहेत. त्या तुलनेत या गोळीची किंमत १०० रुपये किंवा त्यापेक्षाही कमी आहे. आम्हाला या गोळीसाठी मंजुरी मिळायची आहे. जून ते जुलै महिन्यापर्यंत केमो सुरु केल्यानंतर होणारे साईड इफेक्ट कमी करणारी गोळी आम्ही आणू शकू असा विश्वास आम्हाला आहे. मात्र कर्करोग चौथ्या स्टेजला जाऊ नये किंवा त्याचा धोका कमी करण्यासाठी जी गोळी आम्ही आणणार आहोत त्याला काही कालावधी जाईल असं बडवे यांनी एनडीटीव्हीला सांगितलं.

कॅन्सर जेव्हा रुग्णाला होतो तेव्हा अनेकदा सर्जरी करावी लागते. उपचार पद्धतींमध्ये बदल झाला आहे. मात्र ही गोळी कर्करोग शरीरात पसरू नये यासाठी महत्त्वाची असणार आहे. समजा एखाद्या महिलेस ब्रेस्ट कॅन्सर झाला तर आता ५० टक्के रुग्ण त्यातून वाचू शकतात. कुठल्याही उपचार पद्धतीने जर तीन ते चार वर्षे उपचार होत राहिले तर त्यात आपण आणखी सुधारणा कशी करु शकतो हे शोधलं पाहिजे असंही डॉ. राजेंद्र बडवे यांनी म्हटलं आहे.

पहिल्यांदाच असं घडलं आहे की गोळी तयार करताना आम्हाला आपण कुठे चुकत होतो हे कळलं आहे. आम्ही जी गोळी आणत आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कर्करोगाचे साईड इफेक्ट कमी होणार आहेत. तर इतर कर्करोगांच्या प्रकारांमध्ये आम्ही हे पाहतोय की ही गोळी कशी गुणकारी ठरेल. फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाला होणारा कर्करोग यावर ही गोळी कशी गुणकारी किंवा प्रभावी ठरेल यासाठी आम्ही संशोधन करत आहोत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata institute claims success in cancer treatment with rs 100 tablet scj