मुंबई : वारंवार गैरवर्तन आणि देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ने (टिस) ‘पीएच.डी.’च्या रामदास केएस या दलित विद्यार्थ्याला दोन वर्षांसाठी निलंबित केले. तसेच देशातील ‘टिस’च्या सर्व संकुलात प्रवेश करण्यास त्याला बंदी घातली आहे. यासंदर्भातील एक नोटीस रामदासला गुरूवार, १८ एप्रिल रोजी पाठविण्यात आली असून पुढील ३० दिवसांत स्वतःची बाजू मांडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ‘टिस’ने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ) व इतर विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टिस’च्या कार्यालयाने रामदासला ७ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रुटी आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा निषेध करण्यासाठी १२ जानेवारी रोजी युनायटेड स्टुडंट्स ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात रामदास आणि ‘टिस’मधील काही विद्यार्थी ‘पीएसएफ’डून सहभागी झाले होते.

हेही वाचा…झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश

परंतु ‘पीएसएफ’ ही संघटना ‘टिस’द्वारे मान्यताप्राप्त नाही. या मोर्चात सहभागी होऊन ‘टिस’च्या नावाचा गैरवापर झाला आहे. तसेच २६ जानेवारी रोजी ‘राम के नाम’ या माहितीपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणाऱ्या आशयाची पोस्ट अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा निषेध करण्याच्या उद्देशाने रामदासने सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध केली होती. तसेच २८ जानेवारी २०२३ रोजी ‘टिस’च्या मुंबई संकुलात बंदी असलेला माहितीपट दाखविणे, भगतसिंग स्मृती व्याख्यानासाठी वादग्रस्त वक्त्यांना बोलाविणे, ‘टिस’च्या संचालकांच्या बंगल्याबाहेर रात्री उशिरा घोषणाबाजी करणे असे मुद्दे ‘टिस’ कार्यालयाकडून रामदासला पाठविण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

रामदास केएस कोण?

रामदास हा ‘टिस’मधील स्कूल ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज विभागाचा ‘पीएच.डी.’चा विद्यार्थी आहे. तसेच तो विद्यार्थी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) केंद्रीय कार्यकारी समितीचा सदस्य व महाराष्ट्र राज्य समितीचा सहसचिव आहे. तसेच प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमचा (पीएसएफ) सदस्य व माजी सचिव आहे.

हेही वाचा…भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन हेच आपले जन्मदाता, डीएनए चाचणीच्या मागणीसाठी तरूणीची दिवाणी न्यायालयात धाव

शैक्षणिक बाबींव्यतिरिक्त राजकीय कार्यक्रमांना प्राधान्य

रामदासने शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर उपक्रम आणि राजकीय हेतूंनी प्रेरित कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे रामदासने शैक्षणिक बाबींना प्राधान्य देण्यासाठी ‘टिस’च्या अधिकाऱ्यांकडून वारंवार लेखी सूचना व पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष करीत शैक्षणिक बाबींना प्राधान्य देण्यास रामदास अपयशी ठरला. तसेच ‘टिस’च्या संकुलातील वसतिगृहात बेकायदेशीरपणे राहणेही सुरू ठेवले. त्यामुळे पीएच.डी.चे इतर विद्यार्थी वसतिगृहापासून वंचित राहिले. या सर्व प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने १७ एप्रिल रोजी अहवाल सादर केला आणि त्यानंतरच रामदासला दोन वर्षांसाठी निलंबित केल्याचे ‘टिस’ प्रशासनाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करीत स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata institute of social sciences suspends dalit phd student ramdas ks for misbehavior and anti national stance mumbai print news psg
Show comments