मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ या स्पर्धेच्या माध्यमातून हौशी धावपटूंनी सामाजिक प्रबोधन केले. विविध विषयांवर आधारित सामाजिक संदेश असणारे फलक आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडणारी वेशभूषा करून धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या तीन भावंडांनी एकत्र येत स्वच्छता राखा, मुली वाचवा आणि हवा प्रदूषण रोखण्याचा संदेश दिला. तिन्ही भावंडांनी केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा ‘मुंबई मॅरेथॉन’ या स्पर्धेने द्विदशकपूर्ती केली आहे. मुंबईकरांच्या उत्साहालाही रविवारी उधाण आलेले पाहायला मिळाले. मात्र काही धावपटूंनी सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला. नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारे ४२ वर्षीय श्याम कदम यांनी ‘थुंकू नका, नाहीतर एक दिवस पृथ्वी लाल होईल’ असे म्हणत स्वच्छता राखण्याचा तसेच ‘झाडे लावा’ म्हणत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला. पुणे येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय विनया शिंदे यांनी झाशीची राणी बनत ‘मुली वाचवा’ असा संदेश दिला. मुंबईतील वांद्रे येथे राहणाऱ्या रवीना शिंदे यांनी हवा प्रदूषणामुळे शहर प्रदूषित होत चालले असून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे, हे अधोरेखित करीत ‘हवा प्रदूषण रोखा’ असे आवाहन केले. या तिन्ही भावंडांनी दिलेले सामाजिक संदेश आणि केलेली वेशभूषा ही लक्षवेधी ठरली. तर अनेकांना त्यांच्यासोबत छायाचित्रे व सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

हेही वाचा – सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या घराला आता टाळे

हेही वाचा – Saif Ali Khan : सैफवर हल्ला करुन हल्लेखोर पळाला, त्याने दादरला जाणारी ट्रेन पकडली आणि… नेमकं काय काय घडलं? वाचा घटनाक्रम

‘मी गेल्या तीन वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन सामाजिक संदेश देण्याचे काम करीत आहे, यंदाही बहीणींना प्रोत्साहित करून ‘ड्रीम रन’ गटात सहभागी होण्यास सांगितले. त्यानंतर यंदा आम्ही तिन्ही भावंडांनी एकत्र येत सामाजिक प्रबोधन करायचे निश्चित केले. सार्वजनिक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी साफसफाई केल्यानंतर नागरिक त्याठिकाणी थुंकून अस्वच्छतेचे वातावरण निर्माण करतात. परिणामी या अस्वच्छतेमुळे एक दिवस आरोग्याचा प्रश्न गंभीर आणि पृथ्वी लाल होईल. त्यामुळे स्वच्छता राखा आणि झाडे लावून पर्यावरण संवर्धन करण्याचा मी संदेश दिला. तसेच माझ्या बहिणींनी दररोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढत यंदा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि मुली वाचवा आणि हवा प्रदूषण रोखण्याचा संदेश दिला. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना एक वेगळेच समाधान व आनंद आहे’, असे श्याम कदम यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata mumbai marathon 2025 mumbai three siblings run to spread social message message of maintain cleanliness save girls and prevent air pollution mumbai print news ssb