उमाकांत देशपांडे
मुंबई : वाहनांच्या चार्जिंग व्यवसायात टाटा पॉवर कंपनी ने मोठी झेप घेतली असून २०२८ पर्यंत दोन लाख घरातील चार्जर तर १० हजार सार्वजनिक चार्जर सुविधा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्युत वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने या क्षेत्रातील व्यवसायवाढीसाठी टाटा कंपनीकडून पुढील काळात देशभरात मोठी गुंतवणूक केली जाईल आणि प्रत्येक १५० किलोमीटरवर सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारणीचे प्रयत्न शासकीय पातळीवरही होतील, असे टाटा पॉवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुवीर सिन्हा यांनी सांगितले.
गेल्या तीन-चार वर्षात विद्युत वाहनांच्या संख्येत वाढ होत असून चार्जिंग सुविधा वाढल्यास वाहनांची संख्या आणखी वाढेल. त्यामुळे या व्यवसायातील संधी ओळखून टाटा कंपनी ने गुंतवणूक वाढविण्यास सुरूवात केली आहे. घरातील चार्जिंग सुविधांची संख्या २२-२३मध्ये ३८८९९ होती व ऑक्टोबर २३ पर्यंतच ६५६४० इतका टप्पा गाठला गेला आहे. सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग सुविधा २२-२३ मध्ये २८२२ ठिकाणी तर ऑक्टो. २३ पर्यंत ३७३६ ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. ईबस चार्जिंग सुविधा गेल्या वर्षी २३४ ठिकाणी तर यंदा ऑक्टोबरपर्यंत ५९२ ठिकाणी सुरू करण्यात आली. कार, टँक्सी आदींसाठी फ्लीट चार्जिंग सुविधा गेल्या आर्थिक वर्षात ४४६ ठिकाणी तर चालू वर्षात ७१३ ठिकाणी सुरू झाली, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.
हेही वाचा… म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ घरांसाठी ५ डिसेंबरला सोडत, ५९ हजारांहून अधिक अर्जदार सोडतीत होणार सहभागी
हेही वाचा… गोरेगावमधील अनधिकृत ‘व्यावसायिक’ सदस्यांच्या स्वतंत्र सोसायट्यांबाबत ‘म्हाडा’चेही मौन
शहरांमध्ये वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे केंद्र व राज्य सरकारचेही धोरण आहे. पुढील काळात वेगाने चार्जिंग सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध झाल्या, तर विद्युत वाहनांची संख्या वाढत राहील. त्यासाठी शासकीय, निमशासकीय संस्था, पेट्रोल पंप व अन्य सार्वजनिक ठिकाणांच्या जागी चार्जिंग सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे, असे उच्चपदस्थांनी सांगितले.