टाटा संस्थेमधील पहिला प्रयोग
मुंबई शहरात ध्वनी, पाणी आणि वायुप्रदूषणाबरोबरच प्रकाश प्रदूषणाचा प्रश्नही मोठय़ा प्रमाणावर भेडसावू लागला आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी कुलाबा येथील ‘टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थे’च्या आवारात ‘डाऊन लाइट’ बसविण्यात आले आहेत. या दिव्यांमधून येणारा प्रकाश हा केवळ खालीच परावर्तित होतो. तो वरच्या दिशेला जात नसल्यामुळे प्रकाश प्रदूषण कमी होण्यास मदत होते. असा प्रयोग शहरातील पथदिव्यांच्या बाबतीत झाल्यास रात्रीचे प्रकाश प्रदूषणविरहित आकाश अनुभवता येणार असल्याचा दावा येथील जाणकारांनी केला आहे.
मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद राज्यातील या महानगरांसह अन्य महानगरांतही हल्ली मोठय़ा प्रमाणावर दिव्यांमुळे प्रकाशाचे प्रदूषण होत आहे. इमारतींमधील दिवे, पथदिवे, वाहने तसेच दुकानांचे दिवे यामुळे हे प्रदूषण होते. त्यामुळे रात्री निवांतपणा अनुभवण्यासाठी आकाशाकडे नजर टाकणाऱ्या सामान्यांनाही रात्रीचे काळेभोर आकाश दिसण्याऐवजी प्रकाशमयच दिसते. यात, वायुप्रदूषणानेदेखील भर घातली आहे. यावर मात करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या पण वैज्ञानिक हेतूने आजवर वापर न झालेल्या ‘डाऊन लाइट’चा वापर करण्याचा प्रयोग ‘टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थे’ने केला आहे. यामागे वैज्ञानिक हेतू असून संस्थेच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर पक्षी आहेत. यात अनेक स्थलांतरित पक्षीदेखील असून प्रजोत्पादनासाठी हे पक्षी संस्थेच्या आवारातील झाडांचा आसरा घेतात. या वेळी त्यांच्या प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेवर येथील रात्रीच्या प्रकाशाचा परिणाम होत आहे. त्यामुळे जर रात्रीचा प्रकाश वर आकाशाच्या दिशेने फेकलाच गेला नाही, तर या प्रकाशाचा त्रास या पक्ष्यांना होणार नाही. त्यामुळे, प्रकाशाचा झोत खालीच पडेल यासाठी या ‘डाऊन लाइट’चा वापर करण्याचा प्रयोग केला. यात काही किरकोळ बदल करून भविष्यात संस्थेतील सर्वच दिवे या स्वरूपाचे लावण्याचा मानस असल्याचे संस्थेतील एका वैज्ञानिकाने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा