‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष आणि उद्यम जगतातील उमदे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात मृत्यू झाला. ते ५४ वर्षांचे होते. या निधनानंतर ‘टाटा सन्स’कडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी रविवारी सायरस मिस्त्रींच्या निधानानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना सायरस हे व्यक्तीमत्व होतं जे आयुष्याच्या बाबतीत फार आशावादी होते.
नक्की वाचा >> Cyrus Mistry Death: अपघात कसा झाला? प्राथमिक तपासात समोर आल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; ‘ती’ एक चूक जीवावर बेतली
“मला सायरस यांच्या निधनाबद्दल फार दुख: झालं आहे. ते आयुष्याबद्दल फार आशावादी होते. एवढ्या कमी वयामध्ये त्यांचं निधन होणं हे फरच धक्कादायक आहे,” असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. “या कठीण प्रसंगात माझ्या सहवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,” असंही चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे.
रविवारी डहाणूजवळ झालेल्या या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर डॉ. अनायता पंडोल आणि दरीयस पंडोल हे गंभीर जखमी झाले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मरण पावलेल्या सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळेच अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कार पुलाच्या कठड्याला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात आलं आहे. मागील सीटवर बसल्यानंतर सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबतच्या प्रवाशाच्या जीवावर बेतली. पुढच्या आसनावरील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वापीला हलवण्यात आले.