मुंबई: वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास या वसाहतीतील रहिवाशांना मालमत्ता कराची लाखों रुपयांची थकबाकीसह देयके भरावीच लागणार आहेत. याबाबतचे वृत्त लोकसत्ता दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागातील अधिकाऱ्यांनी रविवारी रहिवाशांची बैठक घेतली व ही देयके एकरकमी भरावी लागणार असल्याचे सांगितले. ही देयके न भरल्यास दरमहा दोन टक्के दंड लागेल, असा इशाराही दिला आहे. रहिवाशांना २०१० पासूनची थकबाकी भरावी लागणार असल्यामुळे रहिवाशांना दुहेरी झटका बसला आहे.
साहित्य सहवासमधील रहिवाशांना डिसेंबर महिन्यात मालमत्ता कराची लाखो रुपयांची देयके आली होती. ही देयके भरण्याची अंतिम मुदत १७ मार्च आहे. पालिकेच आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपत असून तत्पूर्वी रहिवाशांना ही देयके भरावी लागणार आहेत. याबाबतचे वृत्त लोकसत्तामध्ये रविवारी ९ मार्च रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पालिकेच्या एच पूर्व विभागाने रविवारी रहिवाशांची बैठक घेतली. त्यात रहिवाशांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले. मात्र थकबाकीसह देयके मार्च अखेरीसपर्यंत भरावीच लागणार असून ती न भरल्यास पालिकेच्या नियमानुसार दोन टक्के दंडाची कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
साहित्य सहवासमधील घरे ही ६२० आणि ७५० चौरस फुटाची आहेत. काही वर्षांपूर्वी या वसाहतीतील घरांना १२० चौरस फुटाची वाढीव जागा मिळाली होती. या वाढीव जागेचे मालमत्ता कर देयक वेगळे दिले जात होते. मात्र २०२२ मध्ये जेव्हा पाचशे चौरस फुटाच्या आतील घरांना मालमत्ता करमाफी देण्यात आली. तेव्हा या १२० चौरस फूट जागेचे मालमत्ता कर देयक संगणकामध्ये शून्य दाखवण्यात आले होते. २०२२ पासून साहित्य सहवासमधील रहिवाशांना या वाढीव १२० चौरस फुटाचे देयकच येत नव्हते. मात्र वसाहतीमध्ये सध्या पुनर्विकासाचे वारे वाहत असून मालमत्ता कर देयकात १२० चौरस फुटाचा उल्लेख नसल्यामुळे पुनर्विकासात मोठे घर मिळण्यात अडचण येऊ शकते अशी बाब रहिवाशांनीच काही दिवसांपूर्वी पालिकेच्या संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे पालिकेने आता २०२२ पासूनची थकबाकीसह देयके रहिवाशांना पाठवली आहेत. त्याचबरोबर वाढीव क्षेत्रफळ मूळ क्षेत्रफळात समाविष्ट करून नव्याने देयके देताना ती २०१० पासून समाविष्ट करून तशी देयके देण्यात आली आहेत. २०१० पासून रहिवाशांनी जो मालमत्ता कर भरला तो वगळून संपूर्ण वसाहतीला २०१० ते २०२२ या कालावधीसाठी ५१ लाख रुपये जास्तीचे भरावे लागणार आहेत. तसेच २०२२ पासून प्रत्येक सदनिकेला जी थकबाकी दिली आहे ती देखील भरावी लागणार आहे. त्यामुळे ही थकबाकी एकरकमी कशी भरायची असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
पालिकेने आता थकबाकीची देयके एकरकमी दिली आहेत पण अनेकजण सेवानिवृत्त आहेत त्यामुळे त्यांना ही देयके भरणे कठीण होणार आहे. या प्रकरणात मुंबई महापालिका प्रशासनाचीही चूक आहे. त्यामुळे ही थकबाकी भरण्यासाठी रहिवाशांना वाढीव मुदत द्यावी किंवा हफ्त्यांमध्ये भरण्याची सवलत द्यावी, असे मत साहित्य सहवासमधील रहिवासी गौतम नायक यांनी व्यक्त केले आहे.