पालिकेने सरत्या वर्षांच्या अखेरीस भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू केली आहे. आता नव्या वर्षांत या नव्या करप्रणालीनुसार मुंबईतील तब्बल दोन लाख ७० हजार मालमत्ता धारकांना मालमत्ता कराची बिले घरपोच मिळतील. ही बिले मालमत्ता धारकांना येत्या दहा दिवसांत प्राप्त होतील. या नव्या करप्रणालीमुळे मालमत्ता करातील तफावत दूर होणार आहे. मात्र २०१० नंतर उभ्या राहिलेल्या निवासी आणि व्यावसायिक इमारतींना २०१३ पर्यंतची तीन वर्षांची थकबाकी भरावी लागणार आहे.
विशेष म्हणजे ५०० चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळाची सदनिका असणाऱ्या तब्बल १९ टक्के करदात्यांना हा कर दुप्पट भरावा लागणार आहे. तर व्यावसायिक करदात्यांना तिपटीने हा कर भरावा लागेल. करदात्यांना बिल मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत परताव्यासाठी अर्ज करता येईल. मालमत्ता कराचे बिल पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरे यांच्यातील मालमत्ता करप्रणालीत तफावत निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रकाराबद्दल मुंबईकरांच्या मनात एक प्रकारीच अन्यायाची भावनाही होती. ही तफावत दूर करण्यासाठी भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली तयार करण्यात आली व या करप्रणालीला मे महिन्यात मंजुरीही मिळाली. ही करप्रणाली १ एप्रिल २०१० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू असल्याने २०१० ते २०१३ या तीन वर्षांची बिले भरण्यासाठी करदात्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
या करप्रणालीचे सॉफ्टवेअर तयार होण्यास विलंब झाल्याने बिले पाठवण्यास उशीर झाल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र पालिकेच्या ए विभागातील करदात्यांना येत्या दोन दिवसांत बिले पाठवली जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी दिली. तसेच सदनिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीनुसार लावलेला कर कमी किंवा जास्त असल्यास किंवा त्याबाबत काही तक्रार असल्यास येत्या २१ दिवसांत पालिकेकडे तक्रार नोंदवण्याचे आव्हानही पालिकेने केले आहे. त्यासाठी पालिकेच्या प्रभाग कार्यालयांत हेल्प डेस्क तयार केले आहेत.