मुंबईच्या रस्त्यावर गेली ५३ वर्षे धावणा-या पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या प्रिमियर पद्मिनी टॅक्सीचे तिचा हेरिटेज दर्जा लक्षात घेऊन जनत करण्यात यावे अशी मागणी मुंबई टॅक्सी युनियन लवकरच राज्य सरकारकडे करणार आहे.
टॅक्सी युनियनचे अध्यक्ष ए.एल.क्वाड्रोस म्हणाले की, जर ‘धोबी घाट’ हा पर्यटकांचे आकर्षण ठरू शकतो तर जुन्या प्रिमियर पद्मिनीचे मॉडेलही आकर्षणाचा विषय ठरू शकते. दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाऊंटनसारख्या महत्वाच्या ठिकाणी या गाडीचे मॉडेल लोकांसाठी पाहायला ठेवण्यात यावे अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार गाडीच्या वापराचे वय २५ वरून २० करण्यात आले आहे. एकदा का याची अंमलबजावणी सुरू झाली की फक्त ७००० पद्मिनी गाड्या राहतील. आणि पुढील पाच वर्षांत त्याही नाहिश्या होतील.
मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारी ही टॅक्सी १९६० साली सर्वप्रथम मुंबईच्या रस्त्यावर धावली. या गाड्यांचे उत्पादन थांबले असले तरी त्याचे सुटे भाग आजही बाजारात विकत मिळतात. याचे कारण त्याची डागडुजी करणे सोपे आहे, असं क्वाड्रोस म्हणाले.
आरामात पाय पसरून बसण्यासाठी आणि सामानासाठी पुरेशी जागा यामुळे आजही प्रवाशांची या गाडीला पसंती असते. सरकारने काढलेले परिपत्रक अमलात आले नाही तर आणखी दहा वर्षे या गाड्या रस्त्यावर धावताना दिसू शकतील, असंही ते पुढे म्हणाले.
आजघडीला जवळपास अकरा हजार पद्मिनी मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taxi union wants premier padmini cab model preserved
Show comments