‘आयपीए’च्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे औषधविक्रेत्यांचा रुग्ण क्षयमुक्त होण्यासाठी पाठपुरावा
क्षयरोगाच्या निदानाचे प्रशिक्षण दिलेल्या औषधविक्रेत्यांच्या पुढाकारातून क्षयरोगाच्या रुग्णांचे निदान करण्यामध्ये मदत होत असून विक्रेत्याकडून त्यांच्यावर नियमित केल्या जाणाऱ्या उपचारांमुळे रुग्ण क्षयमुक्त होण्यामध्येही हातभार लागत असल्याचे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनने (आयपीए) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालामधून स्पष्ट झाले आहे. डोंबिवलीच्या एका औषधविक्रेत्याने आत्तापर्यत ८० क्षयरोग रुग्णांचे निदान केले आहे.
औषधविक्रेत्यांच्या मदतीने या आजाराचे निदान लवकरात लवकर करावे आणि नियमितपणे रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी आयपीएने २०१० साली प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत सहभागी झालेले औषधविक्रेते प्रशिक्षणानंतर त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांना सरकारी आरोग्य केंद्रामध्ये क्षयरोगाच्या चाचणीसाठी पाठवितात.
२०११-१२ या वर्षभराच्या काळामध्ये ७३ क्षयरोग रुग्णांचे निदान या औषधविक्रेत्यांनी केले असून सुमारे चारशेहून अधिक रुग्णांना औषधे पुरविण्याचे काम केले. २०१४-१७ या काळामध्ये नवीन सहभागी झालेले ६४ औषधविक्रेते १५० हून अधिक रुग्णांना नियमितपणे औषधे देत आहेत.
डोंबिवलीचे दीपक बाराई २०१२ पासून क्षयरोग रुग्णांना औषधे देत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये बाराई यांनी १२५ रुग्णांना क्षयमुक्त केले असून यातील ८० रुग्णांचे निदान त्यांनी केले होते. आम्हाला शंका वाटल्यास आम्ही रुग्णाची चौकशी करून त्याला क्षयरोगाची तपासणी करण्यास सांगतो, असे औषध विक्रेते दीपक बाराई यांनी सांगितले.
माझ्याकडे औषध घेणाऱ्या ३५ वर्षांच्या महिलेने सहा महिन्यानंतर येणेच बंद केले. मग मी तिचे घर शोधत गेल्यावर लक्षात आले की तिची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. छोटय़ाशा घरामध्ये तीन मुलांसह ती राहत होती. त्यावेळेस बरे वाटल्यामुळे तिने औषधे घेण्यास न आल्याचे सांगितले. मात्र उपचार मध्येच सोडल्याने तिचा क्षयरोग चांगलाच बळावला होता. तिची समजूत घालून पुन्हा तिच्यावर उपचार सुरू केले. आत्ता ती बाई पूर्णपणे क्षयमुक्त झाली आहे. रुग्ण पूर्णपणे बरा झाला की आम्हाला हजार रुपये मिळतात. काही रुग्णांची दशा फारच वाईट असते. अशावेळी मग आम्ही हेच हजार रुपयांमधून त्याला पोषक आहार मिळेल अशा गोष्टी देत असतो. – विजय घाडगे, औषधविक्रेते, कोपखैरणे
औषधविक्रेत्यांच्या मदतीने साकारलेला हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याने राज्य सरकारनेही पुढाकार घेऊन औषधविक्रेत्याकडे मोफत क्षयरोगाची औषधे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रमध्ये राबविलेल्या या कार्यक्रमाची दखल केंद्र सरकारनेही घेतली असून गोवा, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड या राज्यांमध्येही आयपीएने औषधविक्रेत्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हा क्षयमुक्त भारत निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त औषधविक्रेत्यांनी यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. – मंजिरी घरत, उपाध्यक्ष, आयपीए