मुंबई: देशातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) कमकुवत कामगिरीने मार्च तिमाहीच्या निकाल हंगामाची बुधवारी निराशनजनक सुरुवात झाली. सरलेल्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने एकत्रित निव्वळ नफा १.६८ टक्क्यांच्या घसरणीसह १२,२२४ कोटी रुपये नोंदविला. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तिने १२,४३४ कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा कमावला होता.
बाजार भांडवलानुसार, देशातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीच्या तिमाही महसुलात ५.३ टक्क्यांची वाढ झाली असून, तो ६४,४७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या वर्षी याच तिमाहीत तिचा महसूल ६१,२३७ कोटी रुपये होता. कंपनीने २०२४-२५ या संपूर्ण आर्थिक वर्षाअखेर ४८,५५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. त्यात ५.७६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षात महसूल ५.९९ टक्क्यांनी वाढून २,५५,३२४ कोटी रुपये झाला आहे.
वार्षिक महसुलाने ३० अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा ओलांडल्याचा आणि सलग दुसऱ्या तिमाहीत मोठे कार्यादेश प्राप्त केल्याचे कंपनीने म्हटले आहे. टीसीएसचे कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि डिजिटल नाविन्यामधील कौशल्य, ग्राहकानुभव आणि जागतिक पातळीवरील ज्ञानामुळे जागतिक पातळीवर कंपनीची कामगिरी अढळ आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतीवासन म्हणाले. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीने ४२,००० प्रशिक्षणार्थी जोडले आहेत.
कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग ३० रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे.
जगभरात गोंधळाची स्थिती
अमेरिकेच्या ‘नाऊ ऑन, नाऊ ऑफ’ अशा अनिश्चिततेत फसलेल्या करवाढीच्या धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर वादळी ढग निर्माण झाले आहेत, ज्यामुळे संपूर्ण जगात गोंधळाची स्थिती आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढीव व्यापार शुल्काला तीन महिन्यांचा विराम जाहीर केला. त्या आधी त्यांनी लादलेल्या कठोर करांमुळे जागतिक आणि मुख्यत: अमेरिकी शेअर बाजारातील मंदीतून गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलरचा तोटा झाला आहे. भारतीय माहिती-तंत्रज्ञान सेवा (आयटी) कंपन्यांवर याचा थेट परिणाम झाला नसला तरी, अमेरिकी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सेवा देणाऱ्या उद्योगांच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आयटी तज्ज्ञांच्या मते, मोठ्या प्रमाणात कर लादल्यामुळे अमेरिकेचीच अर्थव्यवस्था मंदावण्याची आणि पर्यायाने तेथील कंपन्यांकडून तंत्रज्ञानाची मागणी आणि विशिष्ट क्षेत्रातील खर्च कमी होऊ शकतो. याचा एकत्रित परिणाम कंपन्यांच्या कमाईवर होण्याची शक्यता आहे.